ठाणे उपशिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई नाहीच
By admin | Published: April 20, 2015 02:53 AM2015-04-20T02:53:41+5:302015-04-20T02:53:41+5:30
ठाण्याचे माध्यमिक उपशिक्षणाधिकारी अशोक मिसाळ यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक नियमबाह्य कामे केल्याने विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई यांनी
मुंबई : ठाण्याचे माध्यमिक उपशिक्षणाधिकारी अशोक मिसाळ यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक नियमबाह्य कामे केल्याने विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई यांनी त्यांना दोषी ठरविले आहे. मिसाळ यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील शैक्षणिक प्रशासन बिघडल्याचा ठपका शिक्षण संचालकांनी गेल्या वर्षी ठेवला होता. त्यानंतर अद्यापर्यंत मिसाळ यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने शिक्षण क्षेत्रात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.
मिसाळ यांची २0११मध्ये ठाणे जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. याचदरम्यान त्यांच्याकडे प्रभारी शिक्षणाधिकारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या पदावर कार्यरत असताना त्यांनी शिक्षकांच्या नियमबाह्य नेमणुका केल्याचे चौकशीअंती स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मिसाळ यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस शिक्षण संचालकांनी शासनाकडे केलेली आहे.
विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई यांनी मिसाळ दोषी ठरविले आहे. तरीही उपसंचालकांनी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केलेली नाही. मिसाळ हे गेल्या ४ वर्षांपासून या कार्यालयात कार्यरत आहेत. विविध तक्रारी आल्यानंतर मिसाळ हे प्रशासकीय कामकाज करण्यासाठी सक्षम नसल्याचा शेरा शिक्षण संचालकांनी मारला होता.
दरम्यान, शिक्षण संचालकांनी दोषी ठरविल्यानंतरही अद्यापपर्यंत मिसाळ यांच्यावर कारवाई झाली नसल्याने शिक्षण क्षेत्रात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. याबाबत शिक्षण संचालक सर्जेराव जाधव यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)