नौका दर्यात उतरल्याच नाही
By admin | Published: August 2, 2016 03:07 AM2016-08-02T03:07:42+5:302016-08-02T03:07:42+5:30
मच्छीमारांच्या जीवितास असणारा धोका पाहता पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टी वरील एकही नौका सोमवारी समुद्रात उतरली नाही.
पालघर : समुद्रातील मासेमारीला जाण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने १ आॅगस्ट ला परवानगी दिली असली तरी समुद्र पूर्ण खवळलेला आणि वादळी वारे मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने मच्छीमारांच्या जीवितास असणारा धोका पाहता पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टी वरील एकही नौका सोमवारी समुद्रात उतरली नाही. त्यामुळे शासनाने समुद्रात मच्छिमारीसाठी दिलेली तारीख व कालावधी किती चुकीचा आहे हे निसर्गाने आज दाखवून दिले.
महाराष्ट्र मासेमारी अधिनियम १९८१ अंतर्गत महाराष्ट्र शासनाने १४ आॅगस्ट १९६६ मधील दुरु स्ती नुसार सागरी मासेमारी (पावसाळी बंदी) कालावधी १० जून ते १५ आॅगस्ट किंवा नारळी पोर्णिमा या पैकी प्रथम येईल तो दिवस असा जाहीर केला होता. परंतु विधिवत सागराची पूजाअर्चा करीत नारळ अर्पण करूनच पारंपरिक मच्छीमार आपल्या नौका नारळी पोर्णिमे नंतरच समुद्रात पाठवीत होते.
पावसाळी मासेमारी बंदी कालावधी काळात लहान जन्माला आलेल्या पिल्लांचे संवर्धन होऊन नद्या द्वारे मिळणाऱ्या खनिज द्रव्यामुळे प्लवंगाची वाढ होत मत्स्य खाद्य मुबलक प्रमाणात निर्माण होते. या काळात माशांची चांगली वाढ होत असल्याने मत्स्यसंपदा टिकून राहावी, याची दक्षता पारंपरिक मच्छीमार घेत आले होते. तसेच १ मे ते १५ मे दरम्यान स्वयंस्फूर्तिने आपली मासेमारी बंद करीत होते. अशा वेळी मत्स्यसंपदेत होणारी घट आणि अनेक माश्याच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने केंद्र आणि राज्य शासनाने पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत वाढ करने अपेक्षित असताना उलट ९२ दिवसाचा बंदी ६१ दिवसावर आणून ठेवला होता. या निर्णयामध्ये भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप मच्छिमार संघटना अनेक वर्षापासून करीत आहेत. या वर्षी पदुम विभागाच्या उपसचिवांनी १२ नॉटिकल समुद्राच्या बाहेरील क्षेत्राबाहेर पर्ससीननेट धारकांना आपल्या अधिकाराचे बाहेर जाऊन मासेमारी करण्याची परवानगी देऊन आरोपात तथ्य असल्याचे जणू दाखवूनच दिले आहे. (प्रतिनिधी)
>वेधशाळेकडून धोक्याचा इशारा
सातपाटी, डहाणू, वसई, उत्तन बंदरातून माठ्या प्रमाणात मासेमारी केली जात असून शासनाच्या आदेशान्वये १ आॅगस्ट पासून पावसाळी बंदी कालावधी संपून मासेमारीसाठी जाण्या साठी डिझेल, बर्फभरून काही नौका सज्ज झाल्या असताना समुद्रात ५५ ते ६० किलोमीटर प्रति तासाने वादळी वारे वाहून समुद्र खवळलेला राहणार असल्याचा इशारा वेध शाळेने दिल्याने सर्व नौका बंदरात थांबून आहेत.
केंद्र आणि राज्य शासनाने १ आॅगस्ट पासून मासेमारीसाठी दिलेली परवानगी ही अतिघाईची आणि चुकीची असल्याचे सोमवारी निसर्गाने रौद्र रूप धारण करीत दाखवून दिले असल्याची प्रतिक्रिया मच्छीमार विश्वास पाटील यांनी लोकमत कडे व्यक्त केली.