युवतीच्या हत्येबाबत सीसीटीव्ही फूटेज नाही
By admin | Published: March 3, 2017 06:00 AM2017-03-03T06:00:22+5:302017-03-03T06:00:22+5:30
शेजाऱ्यांशी झालेल्या भांडणातून मेघना आगवणे हिच्या हत्येप्रकरणी परिसरात पोलिसांना कोणतेही सीसीटीव्ही फूटेज मिळालेले नाही.
मुंबई : गोरेगावमध्ये किरकोळ कारणावरून शेजाऱ्यांशी झालेल्या भांडणातून मेघना आगवणे हिच्या हत्येप्रकरणी परिसरात पोलिसांना कोणतेही सीसीटीव्ही फूटेज मिळालेले नाही. त्यामुळे प्रत्यक्ष साक्षीदारांच्या माहितीवरून घटनेचा तपास करण्यात येत आहे. आतापर्यंत सहा जणांचे जबाब नोंदविण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
गोरेगावातील मोतीलालनगर क्रमांक १मध्ये नालंदा कॉलनीत हा प्रकार घडला. मेघनाची हत्या चाकू लागून झाली आहे, तो तिच्या वडिलांच्या हाती होता की अन्य कोणाच्या हातात होता, याबाबत विविध शक्यता वर्तविल्या जात आहेत. त्यामुळे परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतून त्याबाबत माहिती मिळविण्याचे पोलिसांचे प्रयत्न होते. मात्र या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले नाहीत. त्यामुळे सीसीटीव्ही फूटेज
मिळण्याची अपेक्षा नाही. या प्रकरणी सहा प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदविले आहेत.
मेघनाच्या कुटुंबीयांचे जबाब अद्याप नोंदविण्यात आलेले नाहीत. सोमवारी सायंकाळी घडलेल्या घटनेप्रकरणी आतापर्यंत शेजारी मंदा घोडेराव ( ४९), सुभाष घोडेराव (५५), शारदा घोडेराव (२२), शीतल घोडेराव (२६), प्रिया तेलोरे (२३) आणि स्मिता तेलोरे (२२) यांना अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)