पाणी न तुंबण्याची पालिकेलाही नाही शाश्वती
By admin | Published: June 10, 2017 01:21 AM2017-06-10T01:21:32+5:302017-06-10T01:21:32+5:30
ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत पंपिंग स्टेशन उभारूनही त्या परिसरात पाणी तुंबणार नाही, याची शाश्वती पालिका प्रशासनाला अद्याप देता आलेली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत पंपिंग स्टेशन उभारूनही त्या परिसरात पाणी तुंबणार नाही, याची शाश्वती पालिका प्रशासनाला अद्याप देता आलेली नाही. त्यामुळे यंदाही मुंबईत तीनशेहून अधिक ठिकाणी पाणी उपसण्याचे पंप बसवून पाणी तुंबणारच असे प्रशासनाने दाखवून दिले आहे. विशेष म्हणजे शंभर कोटी रुपये खर्च करून गेल्या वर्षी ब्रिटानिया आऊटफॉल येथे पंपिंग स्टेशन उभारण्यात आले. तरीही परळमधील हिंदमाता तसेच दक्षिण मुंबईतील काही भागांमध्ये पावसाचे पाणी उपसण्यासाठी ५५ पंप बसवण्यात आले आहेत.
२६ जुलै २००५ रोजी मुंबईची तुंबापुरी करणाऱ्या पावसाळ्यानंतर नाल्यांचे रुंदीकरण व खोलीकरण करण्यासाठी पालिकेने ब्रिमस्टोवॅड प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पांतर्गतच सखल भागांमध्ये तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पंपिंग स्टेशन उभारण्यात आले. परंतु हाजी अली, इर्ला नाला, क्लिव्ह लँड बंदर, लव्ह ग्रोव्ह आणि ब्रिटानिया आऊटफॉल येथे पंपिंग स्टेशनची उभारणी करून त्यावर सुमारे पाचशे कोटी रुपये खर्च केल्यानंतरही अनेक भागांत पंप बसवण्यात येत आहेत. पाच पंपिंग स्टेशन्स सुरू झाल्यानंतरही संपूर्ण मुंबईत ३१३ पंप बसवण्यात येत आहेत. पंपिंग स्टेशन सुरू होण्यापूर्वी मुंबईत २६६ पंप बसवले जात होते. परंतु आता पंपिंग स्टेशन सुरू होऊनही पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप बसवण्याची गरज महापालिका प्रशासनाला वाटत आहे. रे रोडवरील ब्रिटानिया आऊटफॉल येथे पंपिंग स्टेशन गेल्यावर्षीच सुरू करण्यात आले.
भाजपाकडून शिवसेनेची कोंडी : हिंदमाता व दक्षिण मुंबई परिसरात पाणी तुंबणार नाही याचा दिशादर्शक अहवाल सादर करण्याची मागणी भाजपाने पालिका आयुक्त अजय मेहता आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. ब्रिटानिया पंपिंग स्टेशनसाठी ८० कोटी रुपये खर्च केल्यानंतरही या विभागातील पंपांची संख्या कमी न होता वाढली कशी, असा सवाल कोटक यांनी केला. गेल्या वर्षी पंपिंग स्टेशन सुरू झाल्यानंतरही हिंदमातासह इतर सर्व भागांमध्ये पाणी तुंबले होते. म्हणजेच पंपिंग स्टेशन कार्यान्वित नव्हते किंवा पाणी उपसणारे पंप निकामी होते. त्यामुळे यंदाही या ठिकाणी पाणी तुंबण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत भाजपाचे गटनेते कोटक यांनी केला आहे.
शिवसेनेचा बचाव
हिंदमाता परिसराचा भाग हा बशीच्या आकारासारखा खोलगट आहे. त्यामुळे तेथे पाणी तुंबत होते,असे स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी स्पष्ट केले. आता ब्रिटानिया पंपिंग स्टेशन सुरू झाल्यामुळे निश्चित या भागात पाणी तुंबणार नाही, यंदा खऱ्या अर्थाने हे पंपिंग स्टेशन सुरू होणार आहे. मात्र, तरीही खबरदारीची उपाययोजना म्हणून या ठिकाणी पंप बसवण्याची तयारी केली आहे. परंतु हे पंप बसवल्यामुळे पाणी तुंबणार असे भाकीत कुणी करू नये. जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास या पावसाळ्यात होऊ नये याची खबरदारी सत्ताधारी पक्ष म्हणून आम्ही निश्चित घेत आहोत, अशी हमीही त्यांनी दिली.