दहावी व बारावीच्या वेळापत्रकात कोणताही बदल नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2018 07:11 PM2018-02-06T19:11:48+5:302018-02-06T19:12:33+5:30
इयत्ता दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांच्या काही महिन्यांपुर्वी जाहीर करण्यात आलेल्या तारखांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केलं स्पष्ट.
पुुणे : इयत्ता दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांच्या काही महिन्यांपुर्वी जाहीर करण्यात आलेल्या तारखांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यानुसार दि. २१ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत बारावीची तर दि. १ ते २४ मार्चदरम्यान दहावीची परीक्षा होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. मागील वर्षीचे वेळापत्रकाचाही त्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी मंडळाकडून प्रसिध्दीपत्रकाद्वारे परीक्षांच्या तारखा पुन्हा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. मंडळाने दरवर्षीप्रमाणे मार्च २०१८ च्या परीक्षांचे वेळापत्रक काही महिन्यांपुर्वीच जाहीर केले आहे. सद्यस्थितीत त्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, बारावीची परीक्षा दि. २१ फेब्रुवारी ते २० मार्च, तर दहावीची दि. १ ते २४ मार्च या कालावधीत होणार आहे. इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा दि. १ ते १७ फेब्रुवारी तर इयत्ता दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व कलचाचणी परीक्षा दि. १० ते २८ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. इयत्ता बारावी स्टेनोग्राफी, दहावीची दिव्यांग विद्यार्थ्यांची कार्यशिक्षण विषयांची परीक्षा तसेच इयत्ता बारावी व दहावीची आऊट आॅफ टर्न परीक्षा यांचा सविस्तर कालावधी छापील वेळापत्रकात देण्यात आलेला आहे.
परीक्षेपुर्वी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना विभागीय मंडळामार्फत छापील स्वरूपात दिलेलेच वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने किंवा खासगी यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सव माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये. छापील वेळापत्रकामध्ये बदल केला जाणार नाही, असे राज्य मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी स्पष्ट केले.