२०१३ पूर्वीच्या बांधकामावर शुल्क नाही
By admin | Published: January 7, 2015 01:03 AM2015-01-07T01:03:29+5:302015-01-07T01:03:29+5:30
नासुप्रच्या आॅगस्ट २०१४ च्या प्रस्तावानुसार मनपाच्या नगररचना विभागाने शहरात समावेश करण्यात आलेल्या हुडकेश्वर-नरसाळा भागात ८३.०५ प्रति चौ.फूट शुल्क आकारण्याचा प्रस्ताव तयार केला होता.
नागरिकांना दिलासा : १८ कोटींच्या कामांना मंजुरी
नागपूर : नासुप्रच्या आॅगस्ट २०१४ च्या प्रस्तावानुसार मनपाच्या नगररचना विभागाने शहरात समावेश करण्यात आलेल्या हुडकेश्वर-नरसाळा भागात ८३.०५ प्रति चौ.फूट शुल्क आकारण्याचा प्रस्ताव तयार केला होता. परंतु या भागातील नागरिकांचा विरोध लक्षात घेता, १४ मे २०१३ पूर्वी केलेले बांधकाम वा भूखंडावर विकास शुल्क न आकारण्याचा निर्णय मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी दिली.
१४ मे २०१३ नंतरच्या बांधकामावर प्रति चौ.फूट ५५ रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातून या भागातील विकास कामे केली जाणार आहेत.
बैठकीत शहरातील १८ कोटींच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली. हुडकेश्वर-नरसाळा भागातील रस्ते, गडर लाईन व पथदिवे यासाठी पाच कोटींच्या कामांचा समावेश आहे. दिघोरी येथील विनोबाग्राम गृहनिर्माण सहकारी संस्था परिसरातील रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या ७१.८० लाखांच्या निविदेला मंजुरी देण्यात आली. सीए रोड ते शास्त्रीनगर-हिवरी चौक मार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरणाच्या ३८.८९ लाखांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. प्रभाग क्र. ६४, ४५, प्रभाग १०, १ कोटी ६६ लाख, नारा घाट नाल्यावरील पुलाच्या कामाची १.६६ लाखांच्या निविदेला मंजुरी देण्यात आली. मानकापूर येथील ज्ञानेश्वर सोसायटी, वाठोडा प्रभागातील श्रीकृष्णनगर, पेन्शननगर, बोरगाव चौक ते शारदामाता चौक व पटेलनगर मार्गाचे डांबरीकरण, भांडेप्लॉट भागातील रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या निविदेला मंजुरी देण्यात आली. तसेच शहरातील इतर भागातील रस्ते व डांबरीकरणाच्या कामांच्या निविदेला मंजुरी देण्यात आली.(प्रतिनिधी)
विकासासाठी मनपाचा निधी नाही
हुडके श्वर-नरसाळा येथील १४ मे २०१३ पूर्वीच्या बांधकामांना विकास शुल्कातून वगळण्यात आले आहे. परंतु या भागात मनपाच्या निधीतून विकास कामे होणार नाही. शासनाकडून प्राप्त निधीतूनच ती केली जातील, असा निर्णय समितीने घेतला आहे. त्यामुळे या भागातील विकास कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (सविस्तर पान ६)
१२ कोटींच्या फाईल्स निकाली
मावळते आयुक्त श्याम वर्धने यांनी जाता जाता १२ कोटींच्या विकास कामाच्या फाईल्स मंजूर केल्या आहेत. यामुळे शहरातील रस्ते, डांबरीकरण व अन्य कामे मार्गी लागणार असल्याची माहिती बोरकर यांनी दिली.