एसटीकडे भरपाईसाठी दावा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2016 06:34 AM2016-08-23T06:34:32+5:302016-08-23T06:34:32+5:30
महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत एसटीच्या दोन बस प्रवाशांसह वाहून गेल्या.
मुंबई : महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत एसटीच्या दोन बस प्रवाशांसह वाहून गेल्या. या घटनेत एसटीतील १८ प्रवाशांचा मृत्यू झाला. घटनेला १५ दिवस उलटून गेले तरी मृतांच्या नातेवाईकांनी एसटी महामंडळाकडे भरपाईसाठी दावा केलेला नाही. त्यामुळे मदत पोहोचवण्यासाठी एसटी महामंडळच त्यांच्या नातेवाईकांकडे जाणार आहे.
रत्नागिरी आगाराची जयगड-मुंबई व राजापूर आगाराची राजापूर-बोरीवली बस रात्री ११.३५ च्या सुमारास महाडजवळच्या ब्रिटिशकालीन पुलावरून जात होत्या. हा पूल कोसळताच पुरात त्या बस वाहून गेल्या. जयगड-मुंबई बसमध्ये चिपळूण आगाराचे चालक एन. एन. कांबळे, वाहक व्ही. के. देसाई यांच्यासह ९ प्रवासी होते. तर राजापूर -बोरीवली बसमध्ये चिपळूण आगाराचे चालक जी. एस. मुंडे व वाहक पी. बी. शिर्के यांच्यासह नऊ प्रवासी होते. असे एकूण २२ प्रवासी वाहून गेल्याची नोंद एसटी महामंडळाकडे आहे. या घटनेनंतर दहा लाख रुपयांचा विमा व चार लाख रुपयांची नुकसान भरपाई अशी १४ लाख रुपयांची मदत एसटी महामंडळाने मृतांच्या नातेवाईकांना जाहीर केली. मदत जाहीर होताच स्थानिक प्रशासनाकडून मृतांचा आकडा हा २९ आणि त्यानंतर ३१ असल्याचे सांगितले गेले. मात्र बसमधील वाहकांकडे असलेल्या ट्रायमॅक्स तिकिटांच्या मशिनमधील नोंदीनुसार चालक वाहक सोडता १८ प्रवासी असल्याची अधिकृत नोंद आहे. तर घटनेपूर्वी बस घाटातून जात असल्याने ट्रायमॅक्सच्या मशिनला रेंज नव्हती. त्यामुळे उर्वरीत प्रवाशांची नोंद झाली नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र घटनेत मृत झालेल्यांच्या नातेवाईकांनी अद्यापही नुकसान भरपाई मिळविण्यासाठी एसटी महामंडळाकडे संपर्क साधलेला नाही.
घटनेची भीषणता व संवेदनशीलता लक्षात घेऊन महामंडळाकडे नोंद असलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांची भेट घेतली जाईल आणि शहानिशा केला जाणार आहे.