गिरगाव आगीबाबत अद्याप गुन्हा दाखल नाही
By admin | Published: February 26, 2016 04:14 AM2016-02-26T04:14:10+5:302016-02-26T04:14:10+5:30
‘महाराष्ट्र रजनी’ कार्यक्रमात लागलेल्या आगीप्रकरणी सादर केलेल्या अहवालात, आयोजक कॉन्फिड्रेशन आॅफ इंडिया इंडस्ट्रीज आणि इव्हेंट मॅनेजमेंट विझक्राफ्ट इंटरनॅशनल
मुंबई : ‘महाराष्ट्र रजनी’ कार्यक्रमात लागलेल्या आगीप्रकरणी सादर केलेल्या अहवालात, आयोजक कॉन्फिड्रेशन आॅफ इंडिया इंडस्ट्रीज आणि इव्हेंट मॅनेजमेंट विझक्राफ्ट इंटरनॅशनल एन्टरटेनमेंट या कंपनीला जबाबदार धरण्यात आल्याने डी.बी. मार्ग पोलीस आता सक्रिय झाले आहेत. अग्निशमन दलाच्या अहवालानुसार, संबंधित कंपनीविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, अद्याप या प्रकरणी कुठल्याही स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
गिरगाव चौपाटी येथे आयोजित ‘महाराष्ट्र रजनी’ कार्यक्रमात सदोष वायरिंगमुळे आग लागली. त्यात १५ गॅस सिलिंडर व अन्य ज्वलनशील वस्तूंचा साठा स्टेजखाली असल्याने ही आग वेगाने पसरल्याचे अग्निशमन दलाने पालिकेला सादर केलेल्या आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे. या प्रकरणी आयोजक कॉन्फिड्रेशन आॅफ इंडिया इंडस्ट्रीज आणि इव्हेंट मॅनेजमेंट विझक्राफ्ट इंटरनॅशनल एन्टरटेनमेंट या कंपनीला जबाबदार धरण्यात आले आहे. हा अहवाल पालिकेकडून पोलिसांकडे सादर करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात त्यांच्या निष्काळजीपणामुळे ही आग भडकल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्यावर भादंवि २८५ कलमान्वये गुन्हा दाखल करून कारवाई होण्याची शक्यता गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने वर्तविली आहे. मात्र, या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याने अद्याप कुठल्याही स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचे डी.बी. मार्ग पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)
सरकारही जबाबदार असल्याचा विरोधकांचा आरोप
या भीषण आगीसाठी अग्निशमन दलाने आयोजकांवर ठपका ठेवला आहे़ मात्र, आयोजकच नव्हे, तर राज्य सरकारही जबाबदार असल्याचा आरोप महापालिकेतील विरोधी पक्षांकडून होत आहे़
या आगीच्या घटनेचा चौकशी अहवाल अग्निशमन दलाने बुधवारी पालिका आयुक्त अजय मेहता यांना सादर केला़ कार्यक्रमाच्या स्थळी असलेली सदोष विद्युत यंत्रणा व उपकरणे, तसेच स्टेजखालील ज्वलनशील पदार्थांमुळे आगीचा भडका उडाला़ धोक्याची पूर्वसूचना आयोजकांना देऊनही, त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे़
अग्निशमन दल सरकारच्या विरोधात जाऊ शकत नाही, हे माहीत होते, म्हणूनच स्वतंत्र चौकशीची मागणी करत होतो, असे मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी सांगितले़, तर विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे़