कर्जमाफीबाबत पूर्ण समाधानी नाही
By Admin | Published: June 26, 2017 02:31 AM2017-06-26T02:31:12+5:302017-06-26T02:31:20+5:30
कर्जमाफीच्या मुद्यावर आम्ही सरकारला सहकार्य करण्यास तयार आहोत, पण सरकारने शेतकऱ्यांच्या इतर मागण्या मान्य कराव्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कर्जमाफीच्या मुद्यावर आम्ही सरकारला सहकार्य करण्यास तयार आहोत, पण सरकारने शेतकऱ्यांच्या इतर मागण्या मान्य कराव्यात, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले. शेतमालाच्या हमीभावाबाबत स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी तातडीने करावी, अशी मागणीही पवार यांनी या वेळी केली.
पवार म्हणाले, सत्तेवर येण्यापूर्वी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन भाजपाने दिले होते, त्याचे पालन त्यांनी करावे. उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा या सूत्रानुसार शेतमालाचे हमीभाव ठरवून द्यावेत अशी शिफारस स्वामीनाथन कमिटीने केलेली आहे. शेतकऱ्यांना हमीभाव मिळाल्यास तो थकबाकीदार राहणार नाही. त्याचबरोबर शासनाने अद्याप कृषीमूल्य आयोगही नेमलेला नाही, तो तातडीने नेमावा. शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीमुळे नियमित कर्ज फेडणारा एक शेतकरी वर्गही नाराज झाला आहे. आम्ही कर्ज फेडून चूक केली का अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. त्यामुळे नियमित कर्ज फेडणाऱ्यांनाही सवलती शासनाने द्याव्यात. राज्यात कांद्याचे भाव पडले आहेत, कांदा निर्यातीला परवानगी द्यावी, त्यासाठी शासनाने अनुदान द्यावे. शासनाने तूर खरेदी बंद केली आहे. त्यामुळे मराठवाडा व खान्देशातील शेतकरी हवालदिल झाला आहे. तूर खरेदी पुन्हा सुरू करावी. तसेच तुरीची निर्यात करण्यासाठीही अनुदान उपलब्ध करून द्यावे अशी मागणी पवार यांनी केली.
मला जातीयवादी ठरविणाऱ्यांची खदखद बाहेर आली-
इतिहास संशोधकांनी मांडलेल्या तथ्याच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराजांना ‘गो ब्राम्हण प्रतिपालक’ ठरविणे चुकीचे असल्याचे मत मी मांडले होते. त्यामुळे त्याबाबत कोण काय म्हणतो त्याला मी किंमत देत नाही. माझ्यावर जातीयवादाचा आरोप करणाऱ्यांची खदखद त्यातून बाहेर पडत असल्याची टीका पवार यांनी केली.
मीरा कुमार योग्य उमेदवार
राष्ट्रपतीपदासाठी यूपीएकडून उमेदवारी देण्यात आलेल्या मीरा कुमार यांनी सात देशांमध्ये राजदूत म्हणून भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. केंद्रीय कॅबिनेट व संसदेत काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. त्यांचा आंतरराष्ट्रीय प्रश्नांचा अभ्यासही चांगला आहे. त्यामुळे त्या योग्य उमेदवार असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.