समीरविरोधात ठोस पुरावेच नाहीत
By admin | Published: November 20, 2015 01:18 AM2015-11-20T01:18:17+5:302015-11-20T01:18:17+5:30
ज्येष्ठ विवेकवादी नेते कॉ. गोविंद पानसरे (८२) यांच्या हत्येत समीर गायकवाडचा (३२) सहभाग आहे की नाही याची चौकशी पूर्ण झाली असून, त्यातून ठोस काहीही हाती लागले नसल्याचे
- डिप्पी वांकाणी, मुंबई
ज्येष्ठ विवेकवादी नेते कॉ. गोविंद पानसरे (८२) यांच्या हत्येत समीर गायकवाडचा (३२) सहभाग आहे की नाही याची चौकशी पूर्ण झाली असून, त्यातून ठोस काहीही हाती लागले नसल्याचे शपथपत्र लवकरच दाखल केले जाणार असल्याचे संकेत राज्याच्या पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिले. समीर गायकवाडचा पानसरेंच्या हत्येत सहभाग असल्याचा कोणताही पुरावा आम्हाला अद्याप मिळवता आलेला नाही, असे या सूत्रांनी सांगितले.
विशेष तपासणी पथकाच्या (एसआयटी) अधिकाऱ्यांनी मात्र आम्ही अद्याप निर्णयाप्रत आलेलो नाही, असे ‘लोकमत’ ला सांगितले. ‘‘पानसरेंच्या हत्येत समीर गायकवाडचा सहभाग असल्याचा कोणताही पुरावा अद्याप हाती लागलेला नाही व ही बाब नमूद करणारे शपथपत्र न्यायालयात सादर केले जाण्याची शक्यता आहे,’’ असे भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शपथपत्र दाखल झाले की समीर गायकवाड त्याच्या आधारावर जामीन मिळण्यासाठी अर्ज करू शकतो. मात्र याचा अर्थ गायकवाडला पोलीस निर्दोष समजतात (क्लीन चिट) असा होत नाही. तथापि, आज त्याच्याविरुद्ध पोलिसांकडे कोणताही पुरावा नाही, असा त्याचा अर्थ आहे.
पानसरेंच्या हत्येनंतर पोलिसांनी कोटींपेक्षा जास्त फोन कॉल्सची छाननी केली आणि गायकवाडवर तो त्याची मैत्रीण ज्योती कांबळे हिच्याशी पानसरेंच्या हत्येबद्दल बोलत असल्यासंदर्भात आणि मडगाव येथील स्फोटातील आरोपी रुद्र पाटीलच्या संपर्कात असल्याबद्दल नजर ठेवली होती. पाटील सध्या फरार आहे. पानसरेंना कसे संपविले आणि त्यांच्याबद्दल त्याच्या मनात कसा द्वेष आहे याच्या मोठमोठ्या गप्पा गायकवाडने ज्योती कांबळेशी बोलताना कशा मारल्या होत्या याची माहिती यापूर्वी पोलिसांनी दिली होती. गायकवाडच्या घरातून २३ मोबाइल हँडसेटस् व ३१ सिमकार्डस् जप्त केले होते. सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ समीरवर लक्ष ठेवल्यानंतर पोलिसांनी त्याला १६ सप्टेंबर रोजी अटक केली. त्याची चौकशी करण्यात आली असताना त्याचा रेकॉर्ड केलेला आवाज आणि त्याच्यावर लक्ष ठेवण्यात आले असताना घेतलेला आवाजाचा नमुना यांचे विश्लेषण करण्यासाठी पोलिसांनी गुजरात पोलिसांकडे मदत मागितली होती.
दोघांविरुद्ध पुरावे नाहीत
महाराष्ट्र पोलिसांनी मनीष नागोरी (२४) आणि विलास खंडेलवाल (२२) यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्ये प्रकरणी अटक केली होती. या दोघांच्या विरोधात पुरावा नसल्याचे शपथपत्र याआधी पोलिसांनी दाखल केले होते.
एसआयटीने यासंदर्भात काहीही सांगण्यास नकार दिला. ‘‘चौकशी सुरू आहे. गायकवाडच्या अटकेला ९० दिवस पूर्ण व्हायच्या आधी त्याच्यावर आरोपपत्र दाखल करायचे की नाही यासंदर्भातील भूमिका स्पष्ट करू,’’ असे कोल्हापूर विभागाचे पोलीस महानिरीक्षक संजीव वर्मा यांनी सांगितले. १६ फेब्रुवारीला पानसरे व त्यांची पत्नी उमा यांच्यावर कोल्हापूरमध्ये दोघांनी गोळ्या झाडल्या होत्या. चार दिवसांनी पानसरेंचा मृत्यू झाला.