साहित्य संमेलनात अनावश्यक राजकारण्यांची गर्दी नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2016 08:27 PM2016-09-20T20:27:42+5:302016-09-20T20:27:42+5:30
आगामी ९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवलीला होणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा मंगळवारी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या नागपूर येथील कार्यालयात
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २० : आगामी ९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवलीला होणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा मंगळवारी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या नागपूर येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केली. या संमेलनात आवश्यक लोकप्रतिनिधी व्यतिरिक्त व्यासपीठावर राजकारण्यांची गर्दी नसावी, असे सूचीत करण्यात आले आहे.
आयोजनाचा मान डोंबिवलीच्या आगरी यूथ फोरमला मिळाला आहे. संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रमही यावेळी जाहीर करण्यात आला. यंदाच्या संमेलनात बडेजावपणा व ऐश्वर्याचे निष्कारण प्रदर्शन टाळावे, अशी सूचना महामंडळातर्फे आयोजक संस्थेला करण्यात आली. मतपत्रिका वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी लक्षात घेऊन यंदा महामंडळाने याबाबत एक नवीन निर्णय घेतला आहे. निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शी करण्यासाठी अतिरिक्त खर्चाचा फटका सहन करून यावर्षीपासून मतपत्रिका साध्या पोस्टाने न पाठवता रजिस्टार पोस्टाने पाठविल्या जाणार आहेत.