पाणी आहे तर वीज नाही : उपलब्धतेत ४ हजार मेगावॅटची घट
By Admin | Published: May 6, 2017 03:32 AM2017-05-06T03:32:38+5:302017-05-06T03:32:38+5:30
राज्यातील बहुसंख्य भागात तापमानाने चाळीशी गाठल्याने व शेतीला पाणी देण्यासाठी विजेच्या मागणीत तब्बल २ हजार मेगावॅटची
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील बहुसंख्य भागात तापमानाने चाळीशी गाठल्याने व शेतीला पाणी देण्यासाठी विजेच्या मागणीत तब्बल २ हजार मेगावॅटची वाढ होऊन ती १८ हजार मेगावॅटवर गेली आहे. मात्र विविध कारणांमुळे मागणीच्या तुलनेत वीज उपलब्धतेत अंदाजे ४ हजार मेगावॅटपर्यंत घट झाली आहे. परिणामी मुंबईत वगळता राज्यात मोठ्या प्रमाणात भारनियमन करावे लागत आहे. त्यामुळे पाणी आहे तर वीज नाही, अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे.
गुरुवारी महावितरणकडून १५०० मेगावॅट भारनियमन करण्यात आले. प्रशासनाच्या नियोजनाअभावी कोयना धरणातील पाण्याचा राज्याचा निर्धारीत हिस्सा संपल्याने वीज निर्मितीत घट झाली आहे. पाणी लवादाच्या वाटपानुसार कोयना धरणातून राज्याच्या वाट्याला ६७ टीएमसी पाणी येते. मात्र पाण्याचा याआधीच वीज निर्मितीसाठी भरमसाठ वापर झाला. उन्हाळ््यासाठी पाणी राखीव ठेवण्याबाबत कोणतेही नियोजन करण्यात आले नाही. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा तब्बल २ हजार मेगावॅटने विजेची मागणी वाढल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.
महानिर्मितीच्या संचापैकी कोराडी संच क्र. १० (६६० मे.वॅ.), खापरखेडा संच क्र. २ (२१० मे.वॅ.), परळी संच क्र. ८ (२५० मे.वॅ.) तसेच अदानी संच क्र. १ (६६० मे.वॅ.), रतन इंडियाचे संच क्र. ४ व ५ (प्रत्येकी २७० मे.वॅ.) हे तांत्रिक कारणांमुळे बंद आहेत. अदानी आणि रतन इंडिया यांच्या चालू असलेल्या संचामधून कमी वीजनिर्मिती होत आहे.
त्यातच देखभाल दुरुस्तीसाठी चंद्रपूर संच क्र. ७ (५०० मे.वॅ.), कोराडी संच क्र. ६(२१० मे.वॅ.) केंद्राकडून मिळणारा सिपत संच क्र. १ व तारापूर संच क्र. ४ (४०० मे.वॅ.) नियोजितरित्या अगोदरच बंद केल्याने विजेची उपलब्धता ४ हजार मे.वॅ. ने कमी झाली आहे. मात्र त्यानंतरही ३ व ४ मे रोजी महावितरणकडून १ हजार ते १,२०० मे.वॅ. इतकेच भारनियमन करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. अकृषक ग्राहकांना ४०० ते ६०० मे.वॅ. भारनियमनाला सामोरे जावे लागले.
कृषी ग्राहकांसाठी वेळांमध्ये बदल
महावितरणने ५ मे पासून कृषीग्राहकांच्या वाहिन्यांवरून रात्री १ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दोन टप्प्यांमध्ये रात्री व दिवसा ८ तास तीन फेजचा वीजपुरवठा उपलब्ध करून दिला आहे.
चंद्रपूर, कोराडीत हजार मेगावॅटची तूट
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचा एक संच देखभाल दुरूस्तीकरिता बंद आहे. त्यामुळे २९२० मेगावॅट क्षमतेपैकी १९२१ मेगावॅट वीज निर्मिती शुक्रवारी सुरू होती. कोराडी वीज केंद्राची क्षमता २,१७० मेगावॅट आहे. एक संच बंद असून एकूण ११४० मेगावॅट वीजनिर्मिती केली जात आहे. खापरखेडा वीजनिर्मितीची क्षमता १३४० मेगावॅट आहे. सध्या ८८२ मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे.
आठवडाभरात परिस्थिती पूर्ववत
अदानी आणि इंडिया बुल्स कंपन्यांना कोळसा न पोहोचल्यामुळे वीज निर्मिती कमी झाली. त्यामुळे भारनियमनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने संबंधितांची बैठक घेऊन, कराराप्रमाणे वीज द्यावीच लागेल, असे कंपन्यांना सांगितले आहे. आठवडाभरात सर्व परिस्थिती पूर्ववत होईल. - चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जा मंत्री.
धरणाच्या पायथा वीजगृहावर भिस्त
कोयना धरणातील टप्पा क्र. ४ ची वीजनिर्मिती बंद झाली. धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्याने पायथा वीजगृहाच्या विजेवरच भिस्त आहे. ५० टीएमसी पाणी हे सिंचन, बिगर सिंचन, पिण्याच्या पाण्यासहित पूर्वेकडे ताकारी, टेंभू योजनांसाठी वापरण्यात येते. पूर्वेकडील पाणी वापर २६.८७ टीएमसी असून पाणीसाठा २१.०१ टीएमसी आहे.
विविध स्त्रोतांतून वीज खरेदी
महानिर्मिती व अदानी यांच्या निर्मिती संचांपासून वीज उपलब्धतेमध्ये सुमारे ७०० मे.वॅ. इतकी वाढ झाली आहे.