पीएमपीचीही अद्याप नाही सुविधा
By Admin | Published: March 4, 2017 12:56 AM2017-03-04T00:56:36+5:302017-03-04T00:56:36+5:30
गावची लोकसंख्या जवळपास दहा हजारच्या जवळपास असून या गावासाठी महापालिकेची बससेवा अद्याप सुरू नाही.
आंबेगाव बुद्रुक : आंबेगाव खुर्द हे गाव पुणे शहरालगत असल्याने या गावची लोकसंख्या जवळपास दहा हजारच्या जवळपास असून या गावासाठी महापालिकेची बससेवा अद्याप सुरू नाही. येथील नागरिकांना व शाळेच्या विद्यार्थिनींना जवळपास दीड किलोमीटर चालत दत्तनगरमध्ये बससाठी पायपीट करावी लागत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. वयोवृद्ध नागरिकांना आंबेगावातून रिक्षाची सोय नसल्याने चालत जाणे त्रासाचे झाले आहे.
आंबेगाव खुर्द गावठाणापर्यंत बस चालू करण्यासाठी पुणे महानगर परिवहन विभागाला सर्व कागदपत्रांची पूर्तता आंबेगाव खुर्द ग्रामपंचायतीने केली असल्याचे आंबेगाव ग्रामपंचायतसदस्य प्रसाद जगताप यांनी सांगितले. प्रशासनाने त्याच्यावर कोणतीही कारवाई किंवा दखल घेतली नसल्याचे जगताप यांनी सांगितले.
एकीकडे शहरातील पीएमपी सेवेविषयी प्रवाशांच्या असंख्य तक्रारी आहेत. त्यासंबंधी प्रशासन गंभीर नाही. निकृष्ट दर्जाची सेवा मिळत असल्याची तक्रार सर्वत्र होताना दिसते. येथे तर सेवाच मिळत नाही. त्यामुळे होणाऱ्या गैरसोयीकडे कोण लक्ष देणार, हा प्रश्नच आहे. प्रवाशांच्या हाकेकडे पीएमपी प्रशासनाने सकारात्मक पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.
आंबेगाव येथे नुकतेच स्वामी नारायण मंदिर झाले असून भाविकाची गर्दी वाढत आहे व जवळ जांभूळवाडी तलावात नौकाविहारासाठी पर्यटक येत असल्याने लवकरात लवकर बस चालू करण्याची मागणी आंबेगाव खुर्दच्या नागरिकांनी केली आहे.