स्वच्छतागृहांच्या सफाईसाठी निधीच नाही
By admin | Published: July 14, 2017 01:13 AM2017-07-14T01:13:35+5:302017-07-14T01:13:35+5:30
शहरातील स्वच्छतागृहांच्या सफाईसाठी महापालिकेकडे निधीच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पुणे : शहरातील स्वच्छतागृहांच्या सफाईसाठी महापालिकेकडे निधीच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अभिनेत्री मुक्ता बर्वेच्या फेसबुक पोस्टनंतर महापालिका हलली; मात्र सामान्य महिलांच्या तक्रारींकडे लक्ष कोण देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महिला आणि बालकल्याण समितीमध्ये याबाबत वारंवार चर्चा होत असतानाही महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी निधी नसल्याचे कारण देऊन हात वर केले आहेत.
पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील स्वच्छतागृहाचा दुरवस्थेचा प्रश्न पुढे आल्यावर, ‘लोकमत टीम’ने पुण्यातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची पाहणी केली. या स्वच्छतागृहांची अक्षरश: नरकपुरी झाल्याचे दिसून आले आहे.
महानगरपालिकेच्या विविध भागांतील स्वच्छतागृहांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यामध्ये अनेक स्वच्छतागृहे तुंबलेल्या परिस्थितीत दिसून आली. अनेक ठिकाणी पाण्याची सुविधा नाही, खिडक्या तुटलेल्या, दाराला कडी नाही, यामुळे प्रचंड गरज असूनदेखील स्वच्छतागृहात जाणे टाळले जाते. शिवाजीनगर, स्वारगेट, पुणे स्टेशन, मंडई, लक्ष्मीरोड, रविवार पेठ येथील काही सार्वजनिक स्वच्छतागृहांची पाहणी केली असता, पावसामुळे नेहमीपेक्षा अधिकच दुरवस्था झाल्याचे निदर्शनास आले. स्वारगेट बसस्थानक, शिवाजीनगर रेल्वे स्थानक, मंडई आदी परिसरांमधील स्वच्छतागृहांची अस्वच्छता ही शहराच्या आणि पर्यायाने महानगरपालिकेच्या प्रतिष्ठेला धक्का लावणारी बाब आहे. या सार्वजनिक ठिकाणांबरोबरच संभाजीबाग, सारसबाग आदी सार्वजनिक उद्यानांतही वेगळे चित्र दिसत नाही.
शहरातील वाढती लोकसंख्या, महिलांचा सामाजिक आणि विविध क्षेत्रांतील वाढता वावर आणि त्यासाठी करावा लागणारा प्रवास करावा लागतो. या दरम्यान महिलांना स्वच्छतागृहाचा वापर करायचा असेल, तर त्या टाळतात. याचा त्यांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत असतो.
पाण्याची गैरसोय, स्वच्छतेचा अभाव यामुळे या स्वच्छतागृहांचा वापर या महिला करीतच
नाहीत. स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेबाबतही पुरेशी काळजी घेतली जात नाही. स्त्रियांचा हा मूलभूत प्रश्न महानगरपालिकेतर्फे सोडविण्यात यावा, अशी अपेक्षा महिलांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
महिलांनी मांडलेल्या अडचणी ग्रामीण भागातील महिला असो वा शहरातील तरुणी स्वच्छतागृहे या विषयावर बोलणे टाळतात. स्वच्छतागृहांचा वापर करायचा असेल, तर आम्ही घरी आल्यावरच वापर करतो.स्वच्छतागृहांचा वापर करायला नको म्हणून आम्ही भरपूर पाणी पित नाही. कधी स्वच्छतागृहांचा वापर करायचा असेल, तर आम्ही चक्क उपाहारगृहांत जातो.
>सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या सफाईसाठी स्वतंत्र प्रस्ताव
गेल्या एकदीड वर्षात महापालिकेच्या वतीने ‘कम्युनिटी टॉयलेट’ची संकल्पना राबविलेली आहे. या सर्व स्वच्छतागृहांची परिस्थिती चांगली आहे; परंतु शहरामध्ये असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये अद्यापही परिस्थिती सुधारलेली नाही. यासाठी सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. परंतु, ही व्यवस्था खूपच कमी पडत आहे. त्यामुळे लवकरच शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची सफाई करण्यासाठी निधी उभा राहावा, यासाठी स्वतंत्र प्रस्ताव तयार करण्यात येईल.
- कुणाल कुमार, महापालिका आयुक्त
स्वच्छतागृहांच्या सफाईसाठी स्वतंत्र निधी नाही
दुर्गंधीमुळे अनेक स्वच्छातागृहे बंद करण्याची मागणी नियमित महिला व बालकल्याण समितीच्या समोर येते. समितीच्या काही सदस्यांनी नुकतीच महापालिकेच्या काही शाळांमधील स्वच्छतागृहांची पाहणी केली असता, परिस्थिती खूपच बिकट असल्याचे निदर्शनास आले. या स्वच्छतागृहांच्या सफाईसाठी खासगी व चांगल्या दर्जाच्या ठेकेदारांची नियुक्ती करण्याची मागणी प्रशासनाकडे केली; परंतु महापालिका प्रशासनाने स्वच्छतागृहाच्या सफाईसाठी निधीच नसल्याचे स्पष्टीकरण दिले.
- राणी भोसले, अध्यक्षा, महिला व बालकल्याण समिती