वीस वर्षांत एकही आयएएस नाही !
By Admin | Published: July 13, 2015 01:15 AM2015-07-13T01:15:19+5:302015-07-13T01:15:19+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्री-आयएएस कोचिंग सेंटरचा एकही विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये (यूपीएससी)
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्री-आयएएस कोचिंग सेंटरचा एकही विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये (यूपीएससी) मागील २० वर्षांत यश मिळवू शकलेला नाही. विद्यापीठाचे हे केंद्र म्हणजे केवळ शोभेची इमारत झाले आहे.
यूपीएससीच्या परीक्षेत राज्यातून शंभरच्या आसपास विद्यार्थ्यांनी यश मिळविले. औरंगाबादमधील शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयातील चार तर काही खासगी क्लासेसचे विद्यार्थीही यशस्वी झाले. मात्र, विद्यापीठात २० वर्षांपासून असलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा एकही विद्यार्थी परीक्षेत यश मिळवू शकलेला नाही.
विद्यापीठातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हावेत यासाठी वीस वर्षांपूर्वी ‘प्री-आयएएस कोचिंग सेंटर’ स्थापन झाले. मात्र, अद्याप एकही विद्यार्थी यूपीएससीची प्राथमिक किंवा अंतिम परीक्षा उत्तीर्ण होऊ शकलेला नाही.
विद्यापीठाच्या या केंद्राला पूर्ण वेळ संचालक नाही. विद्यापीठातील प्राध्यापकांपैकीच एकावर पाच वर्षांसाठी संचालकपदाची जबाबदारी देण्यात येते. डॉ. यशवंत खिल्लारे सध्या केंद्राचे संचालक आहेत. (प्रतिनिधी)