महाराष्ट्रात तूर्त चिनी गुंतवणूक नाही; चिनी कंपन्यांशी केलेले करार सध्या ‘जैसे थे’च
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 06:19 AM2020-06-23T06:19:46+5:302020-06-23T06:20:11+5:30
गेल्या आठवड्यात केलेले सामंजस्य करार तूर्तास जैसे थे ठेवण्यात आले आहेत, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी स्पष्ट केले आहे.
मुंबई : हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स आणि ग्रेट वॉल मोटर्स या चीन येथील तीन कंपन्यांसमवेत महाराष्ट्र सरकारने गेल्या आठवड्यात केलेले सामंजस्य करार तूर्तास जैसे थे ठेवण्यात आले आहेत, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी स्पष्ट केले आहे. याचा अर्थ ते रद्द केले आहेत, असा नसून त्यावरील पुढील कार्यवाही प्रतीक्षाधीन आहे, असेही ते म्हणाले. चीनने गलवान खोऱ्यात भारतीय जवानांना ज्या क्रूर व रानटी पद्धतीने मारहाण केली, त्यामुळे देशात संतापाचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने करार रद्द केल्याची चर्चा होती.
हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स (फोटोन सोबत संयुक्त भागीदारी) आणि ग्रेट वॉल मोटर्स या तीन कंपन्यांनी अनुक्रमे २५० कोटी, १ हजार कोटी आणि ३ हजार ७७० कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यातील तळेगाव टप्पा-२ पुणेमध्ये करण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र २ अंतर्गत करण्यात आलेल्या १६ हजार कोटी रुपयांच्या १२ करारामध्ये या तीन करारांचा समावेश होता. एकीकडे आपले जवान सीमेवर मारले जात असताना चिनी कंपन्यांशी करार करणे योग्य नाही अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
>केंद्राच्या धोरणाची वाट पाहत आहोत
एकूण ५ हजार २० कोटी रुपयांच्या या प्रकल्पांसंदर्भात सध्याच्या वातावरणात केंद्र सरकारकडून स्पष्ट धोरण जाहीर होण्याची वाट पाहण्यात येईल, असे देसाई यांनी स्पष्ट केले.
भारत - चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर चिनी कंपन्यांशी गुंतवणुकीचे कोणतेही नवे करार करू नयेत, असा सल्ला परराष्ट्र मंत्रालयाने राज्यांना दिला आहे.