तूर्तास भारनियमन नाही
By admin | Published: April 21, 2016 04:58 AM2016-04-21T04:58:00+5:302016-04-21T04:58:00+5:30
भीषण पाणीटंचाईमुळे जलविद्युत प्रकल्पांबाबत प्रश्नचिन्ह असले तरी औष्णिक प्रकल्पातून पुरेशी वीजनिर्मिती होत असल्याने राज्याला भारनियमनाच्या संकटातून तूर्तास दिलासा मिळाला आहे.
मेहरून नाकाडे, रत्नागिरी
भीषण पाणीटंचाईमुळे जलविद्युत प्रकल्पांबाबत प्रश्नचिन्ह असले तरी औष्णिक प्रकल्पातून पुरेशी वीजनिर्मिती होत असल्याने राज्याला भारनियमनाच्या संकटातून तूर्तास दिलासा मिळाला आहे. उन्हाळ्यामुळे विजेचा वापर वाढला असून राज्याला दिवसाला सरासरी १७ हजार ४६४ मेगावॅट वीज लागते. केंद्रीय प्रकल्प, खासगी, महाजनकोच्या प्रकल्पातून दिवसाला सरासरी १९ हजार ०६३ मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. मेमध्ये मागणी वाढली तरी पुरवठा करण्यास महावितरणला कोणतीही अडचण भासणार नाही.
कोयना वीजप्रकल्पात एक हजार ९६० मेगावॅट वीजनिर्मिती होते. सध्या कोयना धरणात २४ टीएमसी इतके पाणी शिल्लक आहे. त्यापैकी १५ टीएमसी पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा, अशा सूचना ऊर्जा विभागाने केल्या आहेत. वीजनिर्मितीसाठी ९ टीएमसी पाणी शिल्लक असून, ३१ मे पर्यंत पुरविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सध्या कोयनेच्या प्रकल्प १ व २ मधून ४० मेगावॅट, प्रकल्प ३ मधून १५७ मेगावॅट तर प्रकल्प ४ मधून ५९३ मेगावॅट वीज निर्मिती होत आहे. भविष्यात ही वीजनिर्मिती कमी प्रमाणात होणार आहे. कोयनेखेरीज परळीचा जलविद्युत प्रकल्प जुलैखेरीज बंदच आहे. जलविद्युत प्रकल्पांची क्षमता कमी असली तरी औष्णिक प्रकल्पांनी मात्र महाराष्ट्रातील जनतेला तारले आहे. मुंबई शहरातील बांद्रा ते दहिसरपर्यंत ‘रिलायन्स’ कंपनीकडून तर कुलाबा ते बांद्रापर्यंत ‘बेस्ट’ अशा दोन खासगी कंपनीकडून वीजपुरवठा करण्यात येत आहे. मुंबईला दोन ते अडीच हजार मेगावॅट लागणारी वीज खासगी कंपनीकडून पुरविण्यात येते. कांजूरमार्ग व दहिसरपासून पुढे उर्वरित संपूर्ण राज्यात महावितरणकडून वीजपुरवठा केला जातो. मुंबईव्यतिरिक्त राज्यातून १७,४६३ मेगावॅट विजेची मागणी करण्यात येत असली तरी औष्णिक प्रकल्पांमुळे महावितरणपुढे सध्या तरी कोणतीही अडचण नाही. केंद्रीय वीज प्रकल्पातून ६,३६३ मेगावॅट, खासगी कंपन्यांकडून ५,५०० मेगावॅट, महाजनकोतर्फे ७,२०० मेगावॅट विजेचा पुरवठा होत आहे. दररोज एकूण १९,०६३ मेगावॅट विजेचा पुरवठा राज्याला होत आहे. ग्राहकांच्या मागणीप्रमाणे पुरवठा करूनही १,५०० मेगावॅट वीज शिल्लक राहत आहे.चंद्रपूर येथील २१० मेगावॅट वीजनिर्मितीचे दोन संच आयुर्मान संपल्यामुळे बंद करण्यात आले आहेत. परंतु ५०० मेगावॅट वीजनिर्मिती करणारे दोन संच मात्र सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे तेथून वीजपुरवठा सुरू आहे. कोयना प्रकल्पातून वीजनिर्मिती बंद होण्याच्या मार्गावर आहे. उन्हाळ्याकरिता अल्पकालीन वीज खरेदीची तरतूद केली आहे. परंतु औष्णिक प्रकल्पातून पुरेसा वीजपुरवठा होत असल्यामुळे वीज खरेदीची गरज भासणार नाही.
- पी. एस. पाटील, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण, प्रकाशगड, मुंबई.