पालिकेच्या कार्यक्रमांना पालकमंत्र्यांना निमंत्रणच नाही
By admin | Published: April 29, 2016 12:43 AM2016-04-29T00:43:47+5:302016-04-29T00:43:47+5:30
कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीश बापट यांना वैयक्तिकरीत्या निमंत्रणच देण्यात आले नव्हते़
पुणे : पालिकेचा कोणताही कार्यक्रम असला व उद्घाटक कोणीही असला तरी पालकमंत्र्यांना आवर्जून निमंत्रण दिले जाते़ स्वत: महापौर फोन करून त्यांना आग्रहाने येण्याची विनंती करतात़ ही पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रथा पडली आहे़ पण, गेल्या काही महिन्यांत ही प्रथा मोडित काढण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे़
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शहरात गुरुवारी अनेक विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले़ या कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीश बापट यांना वैयक्तिकरीत्या निमंत्रणच देण्यात आले नव्हते़
पालकमंत्री हे पद घटनात्मकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. विविध विभागांच्या बैठकांचे अध्यक्षपद पालकमंत्री भूषवितात. जिल्ह्यातील विकासकामांना निधी देण्यामध्ये पालकमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमांचे आयोजन करणे हा संकेत आहे.
पक्षीय राजकारणाच्या पलीकडे या पदाकडे पाहिले जाते. सत्ता कोणाचीही असली तरी पालकमंत्री म्हणून महापालिकेच्या कार्यक्रमांना त्यांना बोलविले जाते़ त्यासाठी अगोदर संपर्क करून वेळ निश्चित केली जाते़ महापौर पालकमंत्र्यांना वैयक्तिकरीत्या फोन करून त्यांना कार्यक्रमाची वेळ सोयीची आहे का, याची चौकशी करून निमंत्रण देतात़ पालिकेचा कार्यक्रम हा कोणत्या एका पक्षाचा कार्यक्रम नसल्याने त्यात सर्व पक्षांचे नेते, कार्यकर्ते सहभागी होत
आले आहे़ पण, गुरुवारी झालेल्या विविध विकासकामांचा उद्घाटन समारंभ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा असल्याचे
दिसून येत होते़ भाजपचे कोणीही पदाधिकारी या कार्यक्रमाला दिसून
आले नाही़ त्यावरून बापट यांना
निमंत्रण नसल्याची चर्चा सुरू
झाली होती़ राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर महापालिकेकडून पालकमंत्र्यांना अशा पद्धतीने पोस्टाने निमंत्रण पाठविले जाते की, ते त्यांना वेळेवर मिळूच नये़
महापौर प्रशांत जगताप म्हणाले, ‘‘या तिन्ही कार्यक्रमांचे गिरीश बापट यांना वैयक्तिक भेटून निमंत्रण दिले आहे़
त्याच दिवशी भरपूर कार्यक्रम असल्यामुळे आपण येऊ शकणार नाही, असे
ते म्हणाले़ पालिकेच्या प्रत्येक कार्यक्रमाचे निमंत्रण त्यांना दिले जाते़
मी राजकीय अस्पृश्यता पाळणारा कार्यकर्ता नाही़’’
>गिरीश बापट यांच्याशी याविषयी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘महापौरांनी, उद्या पुण्यात आहात का?, अशी विचारणा केली होती़ मात्र, कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिका मिळाली नाही़ ती पोस्टाने पाठविली असेल़ ते असे निमंत्रण देतात की, ती वेळ तुम्हाला सोयीची नसेल़’’