अभियांत्रिकी प्रवेशासाठी ‘जेईई’ नाही
By admin | Published: June 9, 2016 05:52 AM2016-06-09T05:52:06+5:302016-06-09T05:52:06+5:30
महाविद्यालयातील प्रवेश जेईई या एकाच परीक्षेच्या माध्यमातून करण्याचा आॅल इंडिया कौन्सिल आॅफ टेक्निकल एज्युकेशनचा (एआयसीटीई) विचार नाही
पुणे : देशातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेश जेईई या एकाच परीक्षेच्या माध्यमातून करण्याचा आॅल इंडिया कौन्सिल आॅफ टेक्निकल एज्युकेशनचा (एआयसीटीई) विचार नाही, असे एआयसीटीईचे अध्यक्ष डॉ.अनिल सहस्त्रबुध्दे यांनी बुधवारी लोकमत’ला सांगितले. देशातील मेडिकलचे प्रवेश केवळ नीट परीक्षेच्या आधारेच दिले जातील, असा निर्णय झाल्याने महाराष्ट्रासह आणखी काही राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. केवळ दोन महिन्यांच्या कालावधीत अभ्यास करून नीट परीक्षा देणे शक्य नव्हते. त्यामुळे केंद्र शासनाला याबाबत अध्यादेश काढावा लागला होता. त्यातच अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे प्रवेशही केवळ जेईई परीक्षेच्या आधारेच घेतले जातील, अशी माहिती समोर आल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. मात्र, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे प्रवेश जेईईच्या आधारे करण्याचा कोणताही विचार नसल्याचे सहस्रबुद्धे यांनी सांगितले. एआयसीटीईकडून पायाभूत सुविधा नसलेल्या आणि विद्यार्थी संख्या कमी असणा-या महाविद्यालयांची तपासणी केली जात आहे. काही संस्थाचालक स्वत:हून महाविद्यालये बंद करण्याचे प्रस्ताव सादर करत आहेत. (प्रतिनिधी)
>सहस्रबुद्धे म्हणाले, ‘‘देशातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेश जेईई परीक्षेच्या आधारे करणे सध्या शक्य नाही. त्याबाबत एआयसीटीईने कोणताही विचार केलेला नाही. एखादी परीक्षा घेवून त्यानुसारच प्रवेश केले जातील,असे अचानक सांगून चालत नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांना दोन वर्षांचा कालावधी दिला पाहिजे. ’’