युतीतील वादाचं काय होईल माहिती नाही
By admin | Published: July 1, 2016 04:22 AM2016-07-01T04:22:31+5:302016-07-01T09:57:47+5:30
भविष्यातील वाटचाल दोन्ही पक्षांवर अवलंबून असेल, असे सांगत आम्हाला ज्या धोरणात्मक गोष्टी पटणार नाहीत, त्यावर आम्ही बोलतच राहू
मुंबई : युतीतील वाद मिटेल की नाही, हे मला माहिती नाही. भविष्यातील वाटचाल दोन्ही पक्षांवर अवलंबून असेल, असे सांगत आम्हाला ज्या धोरणात्मक गोष्टी पटणार नाहीत, त्यावर आम्ही बोलतच राहू, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून १ ते ७ जुलैदरम्यान राज्यभर वनमहोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या काळात वनदिनाच्या निमित्ताने १ जुलै रोजी २ कोटी झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी मुनगंटीवार यांनी आज थेट मातोश्री गाठले. हे निमंत्रण स्वीकारत कार्यक्रमाला हजर राहण्याचे आश्वासन उद्धव यांनी दिले. या वेळी दोन्ही नेत्यांमध्ये १५-२० मिनिटे चर्चा झाली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुनगंटीवार यांनी युतीत सर्वकाही आलबेल असल्याचे सांगत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तर, उद्धव यांनी युतीतील वाद मिटेल की नाही हे मला माहिती नाही. भविष्यातील वाटचाल दोन्ही पक्षांवर अवलंबून असेल, असे स्पष्ट केले. आजची भेट राजकीय नव्हती. आम्ही केवळ जुन्या आठवणींना उजाळा दिला, असे सांगत उद्धव यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले. आम्ही कार्यकर्त्यांना संयम बाळगण्यास सांगितले आहे, असे मुनगंटीवार म्हणाले. (प्रतिनिधी)
>महाजनांच्या भूमिकेत सुधीरभाऊ
पूर्वी युतीत तणावाचे प्रसंग निर्माण होत
तेव्हा दिवंगत भाजपा नेते प्रमोद महाजन ‘मातोश्री’वर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन त्यातून मार्ग काढत. महाजनांनंतर काही काळ गोपीनाथ मुंडे यांनी ही जबाबदारी पार पाडली. त्यांच्यानंतर मात्र भाजपाच्या कोणत्याही ज्येष्ठ नेत्याने अशी शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला नाही. उलट, मातोश्री भेटीचा प्रकार थांबविण्याचेच धोरण पक्षाने स्वीकारले होते. मात्र, गुरुवारी मुनगंटीवारांनी ‘मातोश्री’ला भेट देत महाजनांची परंपरा
सुरू ठेवली.
>उद्धव यांना वाघ भेट
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या वेळी उद्धव यांना फायबरच्या पूर्णाकृती वाघाचे शिल्प भेट दिले. याबाबत छेडले असता, राज्यातच नाही, तर देशातही वाघ वाढवायला हवेत, यावर आमचे एकमत झाले आहे, असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी काढला.
>१० जुलैपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार
या भेटीत काही राजकीय विषयांवरही चर्चा झाली. युतीतील वादावर पडदा टाकत नव्याने वाटचाल करण्याबाबत आमचे एकमत झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परदेश दौऱ्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार असून, शिवसेनादेखील या विस्तारात सहभागी होणार असल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री १० ते १६ जुलैदरम्यान रशियाचा दौरा करणार आहेत.