स्वतःला कृष्णाची उपमा दिल्यानं कोणी कृष्ण होत नाही- उद्धव ठाकरे
By admin | Published: January 29, 2017 05:26 PM2017-01-29T17:26:45+5:302017-01-29T17:27:07+5:30
स्वतःला कृष्णाची उपमा दिल्यानं कोणी कृष्ण होत नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपावर पलटवार केला आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - स्वतःला कृष्णाची उपमा दिल्यानं कोणी कृष्ण होत नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपावर पलटवार केला आहे. भाजपाच्या काल झालेल्या विजय संकल्प मेळाव्यात मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेची तुलना कौरवांशी, तर उद्धव यांची तुलना दुर्योधनाशी केली होती. तसेच भाजपाला पांडव म्हटलं होतं. त्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री आणि आशिष शेलारांवर टीकेची तोफ डागली आहे. मी जास्त बोललो तर माझा घसा बसेल, असा उपरोधिक टोला त्यांनी भाजपाला हाणला आहे.
मुख्यमंत्र्यांची स्वच्छ प्रतिमा आता मलिन झाली आहे. ते आता गुंडांचे मंत्री तर नाहीत ना, असा अनेकांना प्रश्न पडला आहे. लाल किल्ल्यावर भाषण केल्यानं कोणी पंतप्रधान होत नाही, तर स्वतःला पांडव म्हटल्यानं कोणी पांडवही होत नाही, असं उद्धव ठाकरेंनी आशिष शेलारांना प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपाला जी काही टीका करायची आहे ती करू द्या, त्याकडे लक्ष न देता आपण केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवा, असं आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केलं आहे.
(भाजपा पांडव, शिवसेना कौरव - आशिष शेलारांचे टीकास्त्र)
आम्ही मुंबईला घडवल्याशिवाय शांत बसणार नाही. मुंबई-ठाणेकरांना दिलेली आश्वासनं नक्की पूर्ण करणार असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. माझ्या पारदर्शकतेच्या मुद्द्यावर आणि अच्छे दिनबद्दल आता कोणीच का बोलत नाही, असा सवालही उद्धव यांनी उपस्थित केला आहे. सगळ्यांचे मुखवटे आता उतरले आहेत आणि त्यांचे खरे चेहरे लोकांसमोर आले आहेत, असंही ते भाजपाला उद्देशून म्हणाले आहेत.