शहरात वृक्षसंवर्धनासाठी यंत्रणाच नाही

By admin | Published: July 23, 2016 02:54 AM2016-07-23T02:54:32+5:302016-07-23T02:54:32+5:30

वाढत्या शहरीकरणामुळे नवी मुंबई, पनवेल व उरणमधील हरितपट्ट्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

There is no mechanism for tree conservation in the city | शहरात वृक्षसंवर्धनासाठी यंत्रणाच नाही

शहरात वृक्षसंवर्धनासाठी यंत्रणाच नाही

Next

नामदेव मोरे,

नवी मुंबई- वाढत्या शहरीकरणामुळे नवी मुंबई, पनवेल व उरणमधील हरितपट्ट्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. खारफुटीही नष्ट केली जात आहे. प्रत्येक वर्षी शासकीय यंत्रणा व राजकीय, सामाजिक संघटना वृक्षारोपण करतात परंतु संवर्धनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. वृक्षसंवर्धनासाठी यंत्रणाच नसल्याने शहरातील जंगल व हरित पट्ट्यांचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत चालले आहे.
नवी मुंबईला निसर्गाची मोठी देणगी लाभली आहे. सिडको कार्यक्षेत्रामध्ये तब्बल १५० किलोमीटरचा खाडीकिनारा लाभला आहे. याशिवाय खारघर ते दिघा पर्यंतच्या डोंगररांगा अडवली भुतावली परिसरातील वनविभाग असा विस्तीर्ण हरितपट्टा लाभला आहे. याशिवाय सिडको, महापालिका, पनवेल व उरण तालुक्यामधील राजकीय व सामाजिक कार्यकर्ते प्रत्येक वर्षी जवळपास ५ लाख वृक्षांची लागवड केली जाते. यावषी राज्य शासनाने वर्षभरामध्ये २ कोटी वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट जाहीर करताच महापालिकेनेही २ लाख वृक्ष लावण्याचे निश्चित केले. १ जुलैला शहरभर सर्वत्र वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. यामध्ये लोकप्रतिनिधी, सर्व शिक्षण संस्था व पर्यावरणप्रेमी नागरिकांनी वृक्षारोपण केले. एकाच दिवशी २० हजार वृक्षांची लागवड झाली. प्रत्येकाने पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी केलेल्या कामगिरीची छायाचित्रे सोशल मीडिया व प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध करून घेतली. परंतु प्रत्यक्षामध्ये ८० टक्के वृक्षलागवड केलेल्या ठिकाणी त्यांचे संवर्धन करण्यासाठीची यंत्रणाच उपलब्ध नाही. ज्यांनी वृक्ष लावले त्यांनी संवर्धनाची जबाबदारी घेतलेली नाही. औपचारिकता म्हणून वनमहोत्सवामध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. यामुळे प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वेळी उन्हाळ्यात पाणी न मिळाल्याने वृक्ष कोमेजून जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवी मुंबई अडवली भुतावली परिसरामध्ये ४५० हेक्टरवर व बोरीवली परिसरात ६४४ हेक्टरवर प्रादेशिक उद्यान विकसित करणार होते. परंतु प्रत्यक्षात या प्रस्तावाची अंमलबजावणी झालीच नाही. आता अडवली भुतावलीमधील वनजमिनीवर निवासी संकुल उभारण्याचा घाट घातला जात आहे. चौदा गावे परिसरामध्येही वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे. यादवनगर ते अडीवली भुतावलीपर्यंत मनपा कार्यक्षेत्रामध्येही वन विभागाच्या जागेवर प्रचंड अतिक्रमण झाले आहे. यादवनगरमधील काही भाग वनविभागाच्या भूखंडावर आहे. शहरामधील सर्वात मोठा हरित पट्ट्याचे अस्तित्व संपू लागले आहे. शहराला १५० किमीचा खाडीकिनारा असून बाजूला खारफुटीचे जंगल आहे. खारफुटी नष्ट करण्यासाठी त्यावर डेब्रिज टाकले जात आहे. प्रत्येक वर्षी वृृक्ष लागवड करूनही वृक्षांची संख्या वाढण्याऐवजी कमी होत आहे. हरित पट्ट्यांचा आकारही कमी होवू लागला असून शासनाने वृक्षसंवर्धनासाठी ठोस उपाययोजना राबविण्याची गरज आहे.
>सर्वात मोठे खारफुटी क्षेत्र
महाराष्ट्र शासनाने राज्यात ५ हजार हेक्टर खारफुटीचे संरक्षित वन घोषित केले आहे. यामधील २५ टक्के अर्थात १४७१ हेक्टर खारफुटी नवी मुंबई परिसरात आहे. परंतु काही वर्षामध्ये खारफुटीचे जंगल नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वृक्षतोड केली जात असून पाणथळ क्षेत्र वाचविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
>ग्रीन ब्रिगेडचा आदर्श
सीबीडीमधील पारसिक हिलवर मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या दक्ष नागरिकांनी ग्रीन ब्रिगेड संघटना तयार केली आहे. पावसाळ्यात वृक्षलागवड करण्याची व वर्षभर वृक्षसंवर्धन करण्याची मोहीम राबविली जात आहे. सनदी अधिकारी सुनील चव्हाण यांच्यासह अनेक पर्यावरणप्रेमी नागरिकांनी कृतीतून वृक्ष संवर्धनाचा आदर्श निर्माण केला आहे.
>महापौरांचा उपक्रम
महापौर सुधाकर सोनावणे यांनी रबाळेमधील ओसाड टेकडीवर वनराई फुलविली आहे. प्रत्येक वर्षी या ठिकाणी वृक्षारोपण केले जाते. वर्षभर कोणाचा वाढदिवस असला तरी तो वृक्षलागवड केली जाते. डोंगरावर ठिबक सिंचनचा वापर करून वर्षभर पाणी पुरविले जात आहे. यामुळे ओसाड टेकडीही हिरवीगार झाली आहे.
> नवी मुंबईतील हरित पट्ट्यांचा तपशील
>उरण, बेलापूर, कळवा परिसरात २१ कि.मी.च्या डोंगर रांगा; आर्टिस्ट व्हिलेजमध्ये २१० हेक्टर हरितपट्टा; व्हॅली पार्कमध्ये ५० हेक्टर जमीन;
खारघर टेकडीवर २०० हेक्टर; पारसिक हिल १५ हेक्टर; खारघर प्लेट्यू १४२० हेक्टर;
भारती विद्यापीठ परिसर २५ हेक्टर; अडवली भुतावली - ४५० हेक्टर; चौदा गावे - ६४४ हेक्टर
विमानतळासाठी खारफुटी नष्ट
विमानतळासाठी खारफुटी नष्ट केली जाणार आहे. या बदल्यात वाघिवली बेटावर २४५ हेक्टर व कामोठेमध्ये ३१० हेक्टरवर वनश्री विकसित केली जाणार आहे. वास्तविक खारफुटीच्या लागवडीच्या वल्गना अनेक वेळा केल्या जातात. परंतु प्रत्यक्षात कार्यवाही होत नाही. सिडको विकसित करत असलेल्या वनश्रीच्या कामावर नियंत्रण व देखरेख ठेवण्यासाठी ठोस यंत्रणा निर्माण करण्याची आवश्यकता पर्यावरणप्रेमी करत आहेत.
>पदपथावर वृक्षारोपण
नेरूळ प्रभाग ८८ मध्ये सेक्टर १५ मध्ये नुकतीच वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. यासाठी स्थानिक राष्ट्रवादीचे नेते सुरेश शेट्टी, नगरसेविका शिल्पा कांबळी यांनी होर्डिंगही लावले होते. परंतु प्रत्यक्षात पदपथावर खड्डे काढून वृक्ष लावण्यात आले. याविषयी काँगे्रसचे पदाधिकारी दिगंबर राऊत यांनी पालिकेकडे तक्रार केली आहे. पदपथावर खोदण्याची परवानगी घेतली आहे का, पदपथावरील वृक्ष संवर्धनाची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न उपस्थित केला असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Web Title: There is no mechanism for tree conservation in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.