राज्यात कोठेही चंद्रदर्शन नाही : रमजान पर्व येत्या शुक्रवारपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 08:54 PM2018-05-16T20:54:48+5:302018-05-16T20:54:48+5:30
इस्लामी कालगणनेतील चालू उर्दू महिना ‘शाबान’ची बुधवारी २९ तारीख असल्याने, संध्याकाळी चंद्रदर्शनाची दाट शक्यता वर्तविली जात होती. बुधवारी चंद्रदर्शन घडले नाही. त्यामुळे चालू उर्दू महिन्याचे तीस दिवस पूर्ण करून शुक्रवारपासून रमजानची सुरुवात करण्यात येईल.
नाशिक : मुस्लीम समाजाच्या उपवासाचा (रोजा) पवित्र महिना रमजान पर्वाला येत्या शुक्रवारी संध्याकाळपासून प्रारंभ होणार आहे. बुधवारी (दि.१६) संध्याकाळी चंद्रदर्शन घडण्याची शक्यता होती;मात्र राज्यासह नाशिक शहरासह जिल्ह्यात कोठेही चंद्रदर्शन घडल्याची ग्वाही राज्य चांद समिती व नाशिक विभागीय चांद समितीला प्राप्त होऊ शकली नाही.
इस्लामी कालगणनेतील चालू उर्दू महिना ‘शाबान’ची बुधवारी २९ तारीख असल्याने, संध्याकाळी चंद्रदर्शनाची दाट शक्यता वर्तविली जात होती. बुधवारी चंद्रदर्शन घडले नाही. त्यामुळे चालू उर्दू महिन्याचे तीस दिवस पूर्ण करून शुक्रवारपासून रमजानची सुरुवात करण्यात येईल. गुरूवारी संध्याकाळी सुर्यास्तानंतर येणारी रात्र ही रमजान पर्वाची पहिली रात्र असणार आहे, त्यामुळे ‘तरावीह’च्या विशेष नमाजपठणाला उद्या रात्रीपासून सर्व मशिदींमध्ये प्रारंभ करण्यात येणार आहे. तसेच शुक्रवारी पहाटे मुस्लीम बांधव अल्पोहार घेत रमजान पर्वाची पहिली ‘सहेरी’ करुन उपवास (रोजा) करतील. सहेरीची समाप्तीची वेळ ४ वाजून ३३ मिनिट अशी आहे. नाशिकमधील शाही मशिदीत शहरातील विविध धर्मगुरुंच्या उपस्थितीत चांद समितीची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत रमजान पर्वाबाबत अंतीम निर्णय धर्मगुरूंकडून घेण्यात आला.
जय्यत तयारी
रमजान पर्वाच्या दृष्टीने मुस्लीम बांधवांकडून तयारी केली जात आहे. उपवासांचे नियोजन असलेलल्या वेळापत्रकांचे वाटप करण्यात आले आहे. पहाटे अल्पोहार घेऊन निर्जळी उपवासाला प्रारंभ केला जातो. सूर्यास्तानंतर संध्याकाळी फलाहार करून मुस्लीम बांधव उपवास सोडतात. रमजान पर्वाचे तीस दिवस समाजबांधवांची दिनचर्या पूर्णपणे बदललेली पहावयास मिळते. धार्मिकदृष्ट्या रमजान पर्वाला विशेष महत्त्व असून, या महिन्यात समाजबांधवांकडून धार्मिक कार्यावर मोठा भर दिला जातो. यामुळे पहाटेपासून तर रात्रीपर्यंत मशिदींमध्ये वर्दळ पहावयास मिळते. मुस्लीम बांधव अधिकाधिक वेळ अल्लाहच्या उपासनेसाठी देण्याचा पुरेपुर प्रयत्न करतात. कुराणपठण, नमाजपठण, तस्बीहपठणावर नागरिकांचा भर असतो. तसेच रमजाच्या दुसऱ्या व तीसºया खंडात दानधर्माला प्राधान्य दिले जाते. कृपाखंड, मोक्षखंड व नरकापासून मुक्तीचा खंड अशा तीन खंडांमध्ये रमजान पर्वची विभागणी करण्यात आली असून प्रत्येक खंड दहा दिवसांचा असतो, असे धर्मगुरू सांगतात.