गणिताची अजिबात आवश्यकता नाही, म्हणणे चुकीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2017 06:27 PM2017-06-21T18:27:18+5:302017-06-21T18:27:18+5:30

दैनंदिन व्यवहारांतील आकडेमोड येण्यासाठी गणिताची गरज आहे; त्यामुळे कला शाखा अथवा व्यवसायिक शिक्षण घेण्यासाठी गणिताची अजिबात आवश्यकता नाही, असे म्हणणे चुकीचे आहे

There is no need for math, it is wrong to say | गणिताची अजिबात आवश्यकता नाही, म्हणणे चुकीचे

गणिताची अजिबात आवश्यकता नाही, म्हणणे चुकीचे

Next

- आर. व्ही. भोसले
दैनंदिन व्यवहारांतील आकडेमोड येण्यासाठी गणिताची गरज आहे; त्यामुळे कला शाखा अथवा व्यवसायिक शिक्षण घेण्यासाठी गणिताची अजिबात आवश्यकता नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. हा विषय ऐच्छिक ठेवण्याऐवजी त्याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आवड कशी निर्माण होईल, या दृष्टीने शासन आणि शिक्षकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

पूर्वी कला (आर्टस) शाखेतून मॅथेमेटिक्स विषय घेऊन बी. ए. करता येत होते. कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालयात या अभ्यासक्रमाची सुविधा होती. बीजगणित, भूमिती, अंकगणित हे विषय शिक्षणामध्ये महत्त्वाचे आहेत. किमान एलिमेंटरी (प्राथमिक) गणिताचे तरी ज्ञान असणे आवश्यक आहे. इतर विषयांच्या तुलनेत गणितामध्ये एकच उत्तर असते. शिवाय ते फायद्याचे ठरते; कारण, उत्तर बरोबर असल्यास पैकीच्या पैकी गुण मिळतात; त्यामुळे हा विषय स्कोअरिंग करण्यासाठी महत्त्वाचा आहे. गणिताचे ज्ञान नसल्यास संबंधित विद्यार्थी अनेकदा व्यावहारिक ज्ञानामध्ये कमी पडण्याची भीती असते. दहावीमध्ये इंग्रजी आणि गणितामध्ये अनुुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक असून, ते वास्तव आहे. गणिताची अनेक विद्यार्थ्यांना भीती वाटते, हेदेखील खरे आहे. मात्र, यासाठी दहावीला हा विषय ऐच्छिक ठेवणे योग्य ठरणारे नाही. त्याऐवजी गणित विषयाची विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करणे आवश्यक आहे. या दृष्टीने शिक्षकांनी सोप्या पद्धतीने आणि विविध क्लृप्त्यांद्वारे गणित विषय शिकविणे अधिक उपयुक्त ठरणारे आहे.

शिक्षकांना प्रशिक्षण गरजेचे
सोप्या, सहज पद्धतीने गणित आणि सोप्या भाषेत इंग्रजी शिकविण्यासाठी शाळा पातळीवरील शिक्षकांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. ज्या शिक्षकांना गणित, इंग्रजी विषय शिकविण्याची आवड आहे, त्यांचीच यासाठी निवड करणे अधिक चांगले ठरणारे आहे.गणित, इंग्रजीच्या शिक्षकांची नियुक्ती करताना त्यांचे पदवी, पदव्युत्तर शिक्षणाचे गुण पाहण्याऐवजी ते संबंधित विषय विद्यार्थ्यांना समजेल अशा शैलीत अथवा पद्धतीने शिकवितात का? हे जाणून घ्यावे. त्यांच्या नियुक्तीमध्ये याचा विचार व्हावा. सध्या संगणकीय युग आहे. त्यामुळे बायनरी (सांकेतिक) गणिताचे ज्ञान विद्यार्थ्यांना शालेय पातळीवर द्यावे.


(लेखक कोल्हापूरस्थित ज्येष्ठ अवकाश संशोधक आहेत)

Web Title: There is no need for math, it is wrong to say

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.