अभिमतच्या जागांसाठी ‘नीट’ची तयारी गरजेचीच
By Admin | Published: May 20, 2016 01:16 AM2016-05-20T01:16:58+5:302016-05-20T01:16:58+5:30
राज्यातील मेडिकलच्या प्रवेशासाठी नीट परीक्षा रद्द करण्याचा अध्यादेश केंद्र शासनाने काढावा,अशी जोरदार मागणी केली
पुणे : राज्यातील मेडिकलच्या प्रवेशासाठी नीट परीक्षा रद्द करण्याचा अध्यादेश केंद्र शासनाने काढावा,अशी जोरदार मागणी केली जात आहे. त्यावर शासनाने यासंदर्भात अध्यादेश काढून राज्यातील मेडिकलचे प्रवेश सीईटीच्या आधारे द्यावेत, असे निर्देश दिले; तरीही अभिमत विद्यापीठांमधील मेडिकलच्या जागांवरील प्रवेशासाठी राज्यातील विद्याथ्यांना ‘नीट’ परीक्षेची तयारी करावीच लागणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या नीट व सीईटी परीक्षेच्या गोंधळामुळे राज्यातील शासकीय मेडिकल कॉलेज, खासगी महाविद्यालये व अभिमत विद्यापीठामधील मेडिकल प्रवेशाच्या जागा कशा भरल्या जातील याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम आहे. केवळ शासकीय महाविद्यालयातील जागाच सीईटीतून भरल्या जातील, अशी चर्चा शिक्षण वर्तुळात सुरू आहे. तसेच अभिमत विद्यापीठांकडून न्यायालयात बाजू मांडण्याबाबत फारशा हालचाली केल्या जात नसल्याचे दिसून येत आहे. अभिमत विद्यापीठामधील प्रवेश नीट परीक्षेच्या माध्यमातून होणार आहेत.
राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक प्रविण शिनगारे म्हणाले, राज्यातील शासकीय मेडिकल कॉलेज व खासगी मेडिकल कॉलेजमधील जागा शासनाच्या ताब्यात आहेत. त्यामुळे नीट परीक्षा रद्द करण्याचा अध्यादेश काढल्यास या जागा सीईटी परीक्षेतून भरल्या जातील. परंतु, अभिमत विद्यापीठाच्या जागांवरील प्रवेश नीट परीक्षेच्या माध्यमातूनच भरल्या जाणार आहेत. राज्यात शासकीय मेडिकल कॉलेजच्या एकूण जागा २ हजार ८०० तर खासगी मेडिकलच्या जागा १ हजार ६०० आहेत. तसेच अभिमत विद्यापीठाच्या जागा १ हजार ७०० आहेत. केंद्र व राज्य शासनाकडून अध्यादेश काढून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याबाबत प्रयत्न केले जात आहेत.