रिफायनरीसाठी समुद्राची गरज नाही, जगातील ३२ रिफायनरीज असलेल्या देशात समुद्रच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 04:24 AM2018-05-08T04:24:50+5:302018-05-08T04:24:50+5:30
‘रिफायनरी हवी असेल तर विदर्भात समुद्र आणा, मी रिफायनरी देतो’, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात केले होते. परंतु, रिफायनरीसाठी समुद्र आवश्यकच आहे, असे नाही, असे जगभरातील रिफायनरींचा अभ्यास केल्यानंतर दिसून येते.
- सोपान पांढरीपांडे
नागपूर - ‘रिफायनरी हवी असेल तर विदर्भात समुद्र आणा, मी रिफायनरी देतो’, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात केले होते. परंतु, रिफायनरीसाठी समुद्र आवश्यकच आहे, असे नाही, असे जगभरातील रिफायनरींचा अभ्यास केल्यानंतर दिसून येते. आजमितीला जगात ६८० रिफायनरीज सुरू आहेत. त्यापैकी ३२ रिफायनरीज असलेल्या १५ देशांमध्ये समुद्र किनारा नाही.
पेट्रोलियम रिफायनरीमध्ये क्रूड आॅईलचे बाष्पीभवन करून त्यापासून पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, विमानाचे इंधन, रॉकेल, पेट-कोक व पेट्रोकेमिकल्स अशी १४३ उत्पादने प्राप्त केली जातात. बाष्पीभवनाच्या प्रक्रियेत भरपूर पाणी आवश्यक असते, म्हणून रिफायनरी समुद्र किनाऱ्यालगत असावी, असे ब्रिटिश काळात रूढ होते.
याशिवाय त्यावेळी क्रूड आॅईलची वाहतूक फक्त समुद्री जहाजातून होत असल्यामुळेही रिफायनरी समुद्र किनाºयालगत टाकल्या जात होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच गृहितकाचा आधार घेऊन ‘‘रिफायनरी हवी असेल तर विदर्भात समुद्र आणा, मी रिफायनरी देतो’’ हे विधान केल्याचे स्पष्ट होते. परंतु तंत्रज्ञान आता खूप पुढे गेले आहे. आधुनिक रिफायनरीमध्ये पाणी कमी लागते. यामुळे हल्ली रिफायनरीकडे रोजगार निर्मितीचे साधन म्हणून बघितले जाते व त्या समुद्र किनाºयापासून दूर असलेल्या मागास भागात टाकल्या जातात. ज्या देशांजवळ समुद्र किनारा आहे, अशा काही देशांमध्येही पेट्रोलियम रिफायनरी समुद्रापासून दूरच्या भागात उभारल्या गेल्याची उदाहरणे पहायला मिळतात. काळाच्या ओघात क्रूड आॅईलची वाहतूक पाइपलाइनद्वारे होऊ लागली आहे व त्यात पैशाची प्रचंड बचत होत आहे. कारण रेल्वेने क्रूड आॅईलचा वाहतूक खर्च लिटरला ४ रुपये पडतो तर पाईपलाईनद्वारे केवळ ३० पैसे खर्च येतो.
समुद्र नसलेल्या देशातील रिफायनरीज
देश रिफायनरीज
१) आॅस्ट्रिया १
२) अझरबैजान २
३) बेलारूस २
४) बोलिव्हिया ५
५) चाड १
६) झेकोस्लोवाकिया ४
७) हंगेरी २
८) कझाखस्तान ३
९) मॅसिडोनिया १
१०) नायझर १
११) सर्बिया ३
१२) स्लोव्हाकिया २
१३) स्विर्त्झलंड २
१४) तुर्कमेनिस्तान २
१५) झांबिया १
एकूण ३२