वर्षात एकही नवे वसतीगृह, आश्रमशाळा नाही

By Admin | Published: July 10, 2017 03:36 AM2017-07-10T03:36:05+5:302017-07-10T03:36:05+5:30

पालघर जिल्हयातील डहाणू, तलासरी, पालघर, वसईसारख्या आदिवासी बहुल तालुक्यात एकही नवीन वस्तीगृह, आश्रमशाळा, सुरू झालेले नाही.

There is no new hostel in the year, no Ashram school | वर्षात एकही नवे वसतीगृह, आश्रमशाळा नाही

वर्षात एकही नवे वसतीगृह, आश्रमशाळा नाही

googlenewsNext

शौकत शेख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
डहाणू: डहाणू तालुक्यात एका बाजूला इयत्ता आठवीतून पास झालेल्या हजारो विद्यार्थ्यांना नववीत प्रवेश मिळत नसल्याने प्रवेशासाठी त्यांना वणवण भटकण्याची वेळ आली असतांनाच गेल्या वर्षभरात पालघर जिल्हयातील डहाणू, तलासरी, पालघर, वसईसारख्या आदिवासी बहुल तालुक्यात एकही नवीन वस्तीगृह, आश्रमशाळा, सुरू झालेले नाही. त्यामुळे दहावी, बारावी, पास झाल्यानंतर शहरातील वस्तीगृहात राहून महागडे शिक्षण घेण्याची पाळी आदिवासी विद्यार्थ्यांवर येते आहे. म्हणून सध्याच्या आश्रमशाळा व वस्तीगृहांची क्षमता वाढविण्यासाठी आदिवासी विकास विभागाने त्वरीत नवीन वस्तीगृह व आश्रमशाळा सुरू कराव्यात. शिवाय विद्यमान वस्तीगृहात पलंग, गाद्या, तसेच सोयी सुविधांचा पुरवठा करून आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहीत करावे. अन्यथा पांच हजाराचा मोर्चा कढून आंदोलन करण्याचा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सेक्रेट्ररी कॉ. अ‍ॅडवर्ड वरठा, जि.प. सदस्य रडका कलांगडा यांनी दिला आहे.
डहाणू एकात्मिक आदिवासी विभाग अंतर्गत येणाऱ्या डहाणू, तलासरी, पालघर, वसई, तालुक्यात गेल्या वर्षभरात एकही नवीन वस्तीगृह अथवा आश्रमशाळा सुरू झालेलली नाही. किंवा आहेत त्यांची क्षमताही वाढविली गेलेली नाही. त्यामुळे दहावी, बारावी, उत्तीर्ण झालेल्या आदिवासी मुला, मुलींना प्रवेश मिळणे जिकरीचे झाले आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीही आॅनलाईन अर्ज करणाऱ्या तसेच आमदार, खासदार, पालकमंत्र्यांची शिफारस आणणाऱ्यांनाही निवासी वस्तीगृहात प्रवेश न मिळाल्याने शेकडो विद्यार्थ्यांना सायवन, किन्हवली, शिलोंडा, दिवसी, दाभाडी, शेणसरी, इत्यादी गावातून दररोज कासा, डहाणू येथे जाऊन येऊन शिक्षण घेण्याची वेळ आली होती. त्यामुळे त्यांचा वेळ व पैसा वाया जात आहे.
वस्तीगृह बरोबरच ३५ आश्रम शाळा आहे. त्यास सुमारे १६ हजार आदिवासी विद्यार्थी निवासी शिक्षण घेत आहे. त्यांना दररोज नाश्ता, दुध, केळी, अंडी, बरोबरच दोन वेळचे भोजन आदिवासी विकास विभागामार्फत पुरविले जाते. त्यामुळे रोजगारासाठी स्थलांतरीत होणाऱ्या आदिवासी पालकांना त्यांच्या शिक्षणाची चिंता करावी लागत नाही. परतु आश्रमशाळा किंवा वस्तीगृहात प्रवेश न मिळाल्याने रोजगारासाठी स्थलांतरीत होणाऱ्या आई-वडीलांना आपल्या मुलांना बरोबर घेऊन जावे लागते. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते.
दरम्यान डहाणूच्या कासा भागांतील असंख्य गाव पाड्यात पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने डहाणू तालुक्यातील शाळा, महाविद्यालये, निवासी वसतीगृह, आश्रमशाळांची संख्या कमी पडू लागल्याने गोर,गरीब, निरक्षर आदिवासी पालक चिंताग्रस्त झाले आहेत.
या बाबतीत डहाणूच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आवाज उठविला असून कासा, डहाणू, बोईसर, चिंचणी, पालघर येथे नवीन वस्तीगृहे सुरू करण्याची मागणी केली आहे. येत्या १० जुलै रोजी कम्युनिस्टांचे शिष्टमंडळ प्रकल्प अधिकारी तथा डहाणूच्या प्रांत. लता आंचल गोयल यांना भेटणार असून मागणी मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Web Title: There is no new hostel in the year, no Ashram school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.