दहा लाख देऊनही उमेदवारी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2017 11:55 PM2017-02-05T23:55:46+5:302017-02-05T23:55:46+5:30
पक्षाची उमेदवारी देण्यासाठी २ लाख रुपयांची इच्छुकांकडे मागणी करणाऱ्या भाजपाच्या शहर सरचिटणीसाची ध्वनीचित्रफीत व्हायरल झाल्याने उठलेले वादळ शांत होत नाही तोच
नाशिक : पक्षाची उमेदवारी देण्यासाठी २ लाख रुपयांची इच्छुकांकडे मागणी करणाऱ्या भाजपाच्या शहर सरचिटणीसाची ध्वनीचित्रफीत व्हायरल झाल्याने उठलेले वादळ शांत होत नाही तोच, १० लाख रुपये देऊनही पक्षाने उमेदवारी न दिल्याचा आरोप करणारी भाजपाच्या कामगार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्षांची नवीन ध्वनीचित्रफीत व्हायरल झाल्याने भाजपाचे नेतृत्व अडचणीत आले आहे. विशेष म्हणजे
२ लाख रुपये पक्ष निधीसाठी मागितल्याचे समर्थन करणाऱ्या भाजपाच्या एका आमदारांसमक्षच हा आरोप झाल्याने आता त्याचे समर्थन कसे करावे, असा प्रश्न भाजपा नेत्यांसमोर उभा ठाकला आहे.
भाजपाच्या ‘वसंत स्मृती’ कार्यालयातच महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी शहर सरचिटणीस नाना शिलेदार यांनी एका इच्छुकाकडे उमेदवारी हवी असेल तर
२ लाख रुपयांची मागणी केल्याची ध्वनीचित्रफीत सोशल माध्यमावर व्हायरल झाली होती. ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणवणाऱ्या भाजपाने उमेदवारी वाटप करताना बाजार मांडल्याची सर्वत्र टीका होऊ लागल्यावर आमदार देवयानी फरांदे यांनी मात्र या पैसे मागण्याच्या कृतीचे समर्थन केले व सदरचे पैसे उमेदवारांच्या प्रचारासाठीच गोळा केले जात असल्याचे सांगितले होते. प्रत्येक उमेदवाराकडून २ लाख रुपये अधिकृत घेतले गेल्याचे त्यांचे म्हणणे होते. अर्थात, त्यांच्या या समर्थनाशी कोणी सहमत नसले तरी, भाजपाची उमेदवारी देताना मोठ्या प्रमाणावर पैसे घेतले गेल्याच्या होणाऱ्या आरोपांना पृष्ठी देणारी दुसरी ध्वनीचित्रफीत सोशल माध्यमावर व्हायरल झाल्याने भाजपासाठी तो मोठा धक्का मानला जात आहे.
भारतीय जनता पार्टीच्या कामगार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष गोपाळ पाटील हे प्रभाग क्रमांक २३मधून इच्छुक होते, पक्षाने त्यांना डावलून अलीकडेच पक्ष प्रवेश झालेल्या चंद्रकांत खोडे यांना उमेदवारी दिली आहे. त्याचाच संदर्भ देत व्हायरल झालेल्या या ध्वनीचित्रफितीत गोपाळ पाटील यांनी पक्षाला १० लाख रुपये देऊनही आपल्याला उमेदवारी न दिल्याबद्दल व्यक्त केलेला संताप दिसत आहे. त्यांच्या या संतापाला आमदार देवयानी फरांदे या साक्षीदार असल्याचे दाखविण्यात आले असून, पाटील यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत मात्र त्या शांत आहेत. साधारणत: दीड मिनिटाच्या या ध्वनीचित्रफितीमुळे भाजपाला अन्य राजकीय पक्षांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.
मनसेच्या अभ्यंकरांविरुद्ध तक्रार
व्हिडीओत आरोप करताना दिसलेले भाजपाचे कामगार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष गोपाळ पाटील यांनी यासंदर्भात इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. त्यात सोशल मीडियावर माझा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सदर व्हिडीओत माझे काही शब्द कट करून ही क्लिप व्हायरल केली जात आहे. ही व्हिडीओ क्लिप मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांच्या फोनवरून प्रसारित झाली असून, त्यामुळे या क्लिपची सत्यता पडताळून खोडसाळपणा करणाऱ्यांना शासन करावे, असे तक्रारीत म्हटले आहे.
भाजपाचा व्हिडीओ मध्यरात्रीपासूनच व्हायरल झाला होता. व्हायरल झालेला व्हिडीओ माझ्याकडे आल्यानंतर मी तो खात्री करण्यासाठी एकाला पाठविला. एखाद्या गोष्टीची खात्री करणे यात गैर काय? मुळातच हा व्हिडीओ भाजपाशी संबंधित आहे, तेथे मनसेच्या कार्यकर्त्यांनी जाऊन व्हिडीओ तयार केलेला नाही. त्यामुळे व्हिडीओ कोणी तयार केला येथून चौकशी व्हावी. तो एडीट करण्याइतपत माझे तांत्रिक ज्ञान नाही. बरे तर हा दुसरा व्हिडीओ असून यापूर्वीदेखील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने आणि मुख्यमंत्र्यांनीच या दोन्ही व्हिडीओची सखोल चौकशी करावी.
- अविनाश अभ्यंकर, शहर संपर्काध्यक्ष, मनसे
केंद्रात व राज्यात पारदर्शकतेच्या गोष्टी करणाऱ्या भाजपाने तिकीट विक्रीचा मांडलेला बाजार पाहता, त्यांच्यातील पारदर्शकता कोठे गेली? पक्षाच्या उमेदवारांकडून पैशांची मागणी करून तिकीट विक्री केली जात असेल तर निवडून आलेले पक्षाचे नगरसेवक महापालिकेचा कारभार पारदर्शकतेने करतील अशी अपेक्षा कशी ठेवता येईल?
- रंजन ठाकरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉँग्रेस