वर्गीकरणाशिवाय पर्याय नाही, शहरातील कचरा आणि डम्पिंगचा प्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 02:56 AM2017-09-18T02:56:22+5:302017-09-18T02:56:25+5:30

गेल्या महिन्यात २९ आॅगस्ट रोजी झालेल्या पावसानंतर विविध ठिकाणी कच-याचे ढीग जमा झाल्याचे दिसून आले. त्यानंतर, दैनंदिन जीवन सुरळीत झाले, तरी कच-याच्या समस्येने मुंबईकरांना विचार करायला भाग पाडले.

There is no option without categorizing, city waste and dumping questions are serious | वर्गीकरणाशिवाय पर्याय नाही, शहरातील कचरा आणि डम्पिंगचा प्रश्न गंभीर

वर्गीकरणाशिवाय पर्याय नाही, शहरातील कचरा आणि डम्पिंगचा प्रश्न गंभीर

Next

अक्षय चोरगे ।
मुंबई : गेल्या महिन्यात २९ आॅगस्ट रोजी झालेल्या पावसानंतर विविध ठिकाणी कच-याचे ढीग जमा झाल्याचे दिसून आले. त्यानंतर, दैनंदिन जीवन सुरळीत झाले, तरी कच-याच्या समस्येने मुंबईकरांना विचार करायला भाग पाडले. शहरातील कचरा आणि डम्पिंगचा प्रश्न सोडवायचा असेल, तर कच-याचे वर्गीकरण, कच-याची विल्हेवाट आणि पुनर्वापर या गोष्टींवर मुंबईकरांनी भर देणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत अनेक तज्ज्ञ आणि पर्यावरणप्रेमींनी मांडले.
मुंबईकरांनी जर कचºयाचे वर्गीकरण केले, तर कचºयाची विल्हेवाट लावणे सोपे होईल. सुक्या कचºयाचा पुनर्वापर अथवा सुक्या कचºयातील वस्तूंचा टाकाऊपासून टिकाऊ अशा धोरणांमध्ये वापर करता येणे शक्य आहे. ओल्या कचºयापासून खतनिर्मिती करता येऊ शकते. त्यामुळे अत्यंत कमी कचरा डम्पिंगसाठी न्यावा लागेल. शिवाय कचºयासंबंधीचे प्रश्न सोडविणेदेखील सोपे होईल. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेकडून नागरिकांना ओला कचरा, सुका कचरा वेगळा करा, अशी हाक देण्यात येते. मात्र, अद्याप अपेक्षेपेक्षा कमी लोकांनी त्यास प्रतिसाद दिला. यावरून पालिकेची ही हाक नागरिकांपर्यंत पोहोचते तरी का, असा प्रश्न पर्यावरणतज्ज्ञांनी उपस्थित केला केला आहे. पालिकेने यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे. कचरा करणा-याला शिक्षा करण्यापेक्षा त्या व्यक्तीने कचरा करू नये, यासाठी शिक्षण देणे गरजेचे आहे, असे मत शहर नियोजनतज्ज्ञ सुलक्षणा महाजन यांनी मांडले.
>कचºयाचे
विसर्जन!
कचºयाच्या बाबतीत आपले पूर्वज अधिक सूज्ञ होते. कच-यापासून खतनिर्मितीवर ते भर देत होते. आपणही तसेच करायला हवे. शहरात या गोष्टींसाठी जागा कमी आहे. मात्र, घरामध्ये एका बादलीतसुद्धा आपण बायोडिग्रेडेबल कचºयापासून खतनिर्मिती करू शकतो. त्यासाठी आपल्याला पाश्चात्त्य देशांप्रमाणे विविध मशिन्स आणि तंत्रज्ञानाची आवश्यकता नाही. पारंपरिक पद्धतीने आपण कचºयाची विल्हेवाट लावून खतनिर्मिती करू शकतो.
- एल्सी गॅब्रिएल, संचालिका,
यंग एनव्हायर्नमेंटलिस्ट प्रोग्राम
कचºयाचे वर्गीकरण अत्यंत सोपे आहे. त्यासाठी वेगळे ‘दिव्य’ करण्याची आवश्यकता नाही. मात्र, मुंबईकरांमध्ये जनजागृतीची आवश्यकता आहे. प्रत्येक लहान कुटुंबदेखील प्रतिमहिना किमान ३० किलो कच-याची निर्मिती करते. त्यामुळे एवढ्या कच-याची विल्हेवाट लावणे हे त्यांचे काम आहे. आपण कच-याचे वर्गीकरण करून विल्हेवाट लावू शकलो, तर प्रदूषण रोखण्यात व कमी करण्यात आपल्याला यश मिळेल. कचरा ‘डम्प’ करायला शहरात जागा नाही, अशा वेळी सर्वांनी कच-याचे वर्गीकरण करून व्यवस्थापन करायला हवे. - नुसरत खत्री, पर्यावरणवादी
मुंबईकरांनी कच-याचे वर्गीकरण करावे, यासाठी प्रशासनाने कडक कायदे करण्यासह जनजागृती करणेही गरजेचे आहे. मुंबईच्या तुलनेने नवी मुंबईत कच-याच्या वर्गीकरणावर जास्त भर दिला जातो. शहरातील कच-याचा आणि सोबतच डम्पिंगचा प्रश्न सहज सोडविण्यासाठी वर्गीकरण करणे उपयुक्त ठरेल.
- कल्पना इनामदार, पर्यावरणवादी

Web Title: There is no option without categorizing, city waste and dumping questions are serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.