सरसकट कर्जमाफीशिवाय पर्याय नाही- अशोक चव्हाण

By admin | Published: June 14, 2017 11:13 PM2017-06-14T23:13:27+5:302017-06-14T23:13:27+5:30

तत्वतः, अटी, शर्ती अशा शब्द जंजाळात शेतक-यांना न फसवता राज्यात सरसकट कर्जमाफी द्यावी त्याशिवाय पर्याय नाही.

There is no option without complete debt relief - Ashok Chavan | सरसकट कर्जमाफीशिवाय पर्याय नाही- अशोक चव्हाण

सरसकट कर्जमाफीशिवाय पर्याय नाही- अशोक चव्हाण

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई दि. 14 - तत्वतः, अटी, शर्ती अशा शब्द जंजाळात शेतक-यांना न फसवता राज्यात सरसकट कर्जमाफी द्यावी त्याशिवाय पर्याय नाही. सरकारने घोषणा केल्याप्रमाणे शेतक-यांनी घेतलेले पीक कर्ज आणि कृषी पूरक कर्ज सरसकट माफ करावे ही काँग्रेस पक्षाची मागणी आहे. यासंबंधातली आपली भूमिका काँग्रेस पक्ष लवकरच सरकारला लेखी कळवेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले आहे.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यसरकारतर्फे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची भेट घेऊन कर्जमाफीसंदर्भात चर्चा केली होती. याबाबत चर्चा करण्यासाठी आज टिळक भवन दादर येथे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना खा. चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की सरकारने घोषणा केल्याप्रमाणे राज्यातील सर्व शेतक-यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. अटी व शर्ती घालून अनेक शेतक-यांना वगळण्याचा घाट सरकारने घातला आहे. कर्जमाफीसाठी जमीनीच्या क्षेत्राची किंवा कर्जाच्या रकमेची मर्यादा सरकारने घालू नये. मराठवाडा आणि विदर्भात बहुसंख्य शेतक-यांचे क्षेत्र हे पाच एकरांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे जमीन क्षेत्राची मर्यादा घातली तर बहुसंख्य शेतकरी वगळले जातील.

अल्पभूधारक शेतक-यांची कर्जमाफी झाली असून त्यांना तात्काळ नवीन कर्ज मिळेल अशी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली होती. मात्र यासंदर्भात सरकारने शासन निर्णय काढला नाही, बँकांना लेखी आदेश दिले नाहीत. अनेक शेतक-यांनी बँकेमध्ये जाऊन नविन कर्जाबाबत विचारणा केली मात्र बँकेने आम्हाला सरकारकडून लेखी आदेश नाहीत असे सांगितले आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ सर्व शेतक-यांना बेबाकी प्रमाणपत्र देऊन शेतक-यांना तात्काळ नविन कर्ज उपलब्ध करून देण्याचे आदेश द्यावेत. पेरणीसाठी शेतक-यांना 10 हजार रूपये मदत देण्याची घोषणा केली आहे त्या संबंधीचा शासन निर्णय अद्याप काढला नाही. सरकारने सरसकट  10 हजार रूपये देण्यापेक्षा शेतक-यांना पेरणीसाठी प्रतिएकर मदत द्यावी असे खा. चव्हाण म्हणाले.

काँग्रेस पक्षाने गेली अडीच वर्षापासून सातत्याने कर्जमाफीची मागणी लावून धरली. त्यासाठी विधिमंडळात आणि रस्त्यावर उतरून सातत्याने संघर्ष केला. सर्व विरोधी पक्षांना सोबत घेऊन संघर्ष यात्रा काढली त्याला राज्यभरातील शेतक-यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. कर्जमाफीच्या या प्रदीर्घ लढ्याच्या पार्श्वभूमीवर शेतक-यांनी स्वयंस्फूर्तीने संप पुकारला. त्यामुळे कर्जमाफी देणार नाही, कर्जमाफी हा व्यवहारिक उपाय नाही, कर्जमाफीमुळे बँकांचाच फायदा होतो असे म्हणणा-या मुख्यमंत्र्यांना यु टर्न घ्यावा लागला आणि प्रचंड आढेवेढे घेत का होईना सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा करावी लागली. याचे काँग्रेस पक्ष स्वागत करित आहे असा उपहासात्मक टोलाही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी लगावला.

या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री रोहिदास पाटील, आ. बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, विधानरिषदेतील काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे, आ.नसीम खान, आ. डी. पी. सावंत, राजेंद्र मुळक, आ. चंद्रकांत रघुवंशी, आ. विरेंद्र जगताप, आ. अमर काळे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड. चारूलता टोकस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत, सरचिटणीस अ‍ॅड. गणेश पाटील, पृथ्वीराज साठे,  प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: There is no option without complete debt relief - Ashok Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.