राष्ट्रपतीपदासाठी सरसंघचालकांशिवाय दुसरी महनीय व्यक्ती नाही - उद्धव ठाकरे
By admin | Published: April 25, 2017 07:42 AM2017-04-25T07:42:53+5:302017-04-25T07:49:10+5:30
राष्ट्रपतीपदासाठी आज तरी सरसंघचालकांशिवाय दुसरी महनीय व्यक्ती आम्हाला दिसत नाही असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोहन भागवत यांना खुला पाठिंबा दर्शवला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या तोंडावर आडवाणींच्या मानगुटीवर बाबरीचे भूत बसवून सर्वोच्च न्यायालयानेच एक तगडा स्पर्धक कमी केला. त्यामुळे मुरली मनोहर जोशी हे सरसंघचालकांच्या गुप्त भेटीस जाऊन काही नवे गणित जुळवीत आहेत काय? अशी ‘गुप्त’ चर्चा उघडपणे सुरू आहे. सरसंघचालकांनी मनावर घेतले तर काहीही घडू शकते. अर्थात राष्ट्रपतीपदासाठी आज तरी सरसंघचालकांशिवाय दुसरी महनीय व्यक्ती आम्हाला दिसत नाही. आम्ही आमचे मत मोकळेपणाने मांडले आहे व त्यासाठी गुप्त भेटीगाठी घेण्याची गरज नाही सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोहन भागवत यांना खुला पाठिंबा दर्शवला आहे. सामना संपादकीयच्या माध्यमातून त्यांनी आपले मत व्यक्त केले.
मुरली मनोहर जोशी यांनी नागपुरात जाऊन सरसंघचालकांची ‘गुप्त’ भेट घेतली आहे. या गुप्त भेटीचे वैशिष्ट्य असे की, श्री. मुरली मनोहर संघ मुख्यालयात पोहोचण्याआधीच भेटीचे गुपित उघड झाले. या भेटीचा गवगवा झाला. तरीही जोशी व सरसंघचालकांतील भेट ‘गुप्त’च होती हे मान्य करावे लागेल. अशा वाजतगाजत झालेल्या भेटींना कुणी गुप्त वगैरे म्हणत असतील तर तो मोठाच विनोद म्हणावा लागेल असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
मुरली मनोहर जोशी हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. पण लालकृष्ण आडवाणींप्रमाणे तेदेखील मार्गदर्शक मंडळात गुदमरले आहेत. आडवाणी किंवा जोशींसारखे नेते हे भाजपाचे पुराणपुरुष आहेत. भाजपाच्या वाटचालीत व जडणघडणीत त्यांचे मोठे योगदान आहे. आता नव्या युगात या मंडळींना विशेष काम नाही हे मान्य केले तरी उद्याच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आपल्यासारख्या ज्येष्ठांना काही महत्त्व उरले आहे काय, याची चाचपणी सुरू आहे असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
नागपूरचे संघ मुख्यालय आता सत्तेचे दुसरे केंद्र बनले आहे व यावर कुणाला आक्षेप घेण्याचे कारण नाही. जामा मशिदीचा इमाम हे महाशय सत्तेचे केंद्र ठरू शकतात, तर मग संघाचे मुख्यालय का असू नये? हा साधा सवाल आहे. अर्थात राष्ट्रपतीपदासाठी आज तरी सरसंघचालकांशिवाय दुसरी महनीय व्यक्ती आम्हाला दिसत नाही. आम्ही आमचे मत मोकळेपणाने मांडले आहे व त्यासाठी गुप्त भेटीगाठी घेण्याची गरज नाही असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.
खरी गुप्तता म्हणजे काय, ती कशी तंतोतंत पाळली जाते, या प्रश्नांची उत्तरे आपल्याला इतिहासात मिळू शकतात. छत्रपती शिवरायांनी स्वतःची आग्र्याहून सुटका करून घेतली आणि ते औरंगजेबाच्या नजरकैदेतून सुखरूप निसटले तोपर्यंत त्याची कुणकुण तेथील कोणालाही लागली नव्हती. शिवराय सुखरूप परतल्यानंतरच औरंगजेबाला त्याचा पत्ता लागला. ही खरी गुप्तता. नेताजी सुभाषचंद्र बोस हेदेखील ज्या गोपनीय पद्धतीने ब्रिटिशांची ‘नजर’ चुकवून सुखरूप सीमापार गेले त्याला खरी गुप्तता म्हणता येईल. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बँकांच्या राष्ट्रीयीकरणाचा निर्णय जाहीर करेपर्यंत त्याची ‘खबर’ कुणालाही नव्हती. आज चित्र काय आहे? या देशात आता ‘गुप्त’ असे काही उरले आहे काय? ‘नोटाबंदी’चा पहाड कोसळणार हे वृत्त गुजरातच्या वृत्तपत्रांत आधीच प्रसिद्ध झाले होते! गुप्ततेचे संदर्भ आणि व्याख्या यापुढे बदलाव्या लागतील असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.