Raj Thackeray: बाबासाहेबांच्या इतिहासात दंतकथांना वाव नाही, राज ठाकरेंची भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 07:56 AM2021-08-15T07:56:01+5:302021-08-15T09:44:02+5:30
Raj Thackeray : शिवसृष्टी येथे आयोजित सत्कार सोहळ्यात ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, ‘बाबासाहेबांनी लेखनात अलंकारिक भाषा वापरली नसती तर त्या काळात गोष्टी करणे किती कठीण होते हे कळले नसते.
पुणे : ‘शिवतीर्थावर (शिवाजी पार्क) १९७४ मध्ये शिवसृष्टी उभारण्यात आली, तेव्हा मी सहा वर्षांचा होतो. तिथे ‘बाबासाहेब’ या थोर व्यक्तिमत्त्वाची पहिल्यांदा भेट झाली. तेव्हापासून त्यांचा सहवास लाभला. ‘शिवचरित्र स्पष्ट करताना इतिहासातल्या चुका पुन्हा करू नका. वर्तमानात भानावर या,’ असे ते आवर्जून सांगतात. त्यांच्या इतिहासात दंतकथांना वाव नाही, या शब्दांत मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयीची भावना व्यक्त केली.
शिवसृष्टी येथे आयोजित सत्कार सोहळ्यात ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, ‘बाबासाहेबांनी लेखनात अलंकारिक भाषा वापरली नसती तर त्या काळात गोष्टी करणे किती कठीण होते हे कळले नसते. तुमच्या डोक्यात ती गोष्ट याच अलंकारिक भाषेद्वारे ते पक्की बसवतात. शिवचरित्र अनेकांनी लिहिले; पण बाबासाहेबांनी ते घराघरांत नि मनामनांत पोहोचविले.’
‘...अर्ध्या उघड्या चेहऱ्याच्या बांधवांनो’
‘जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो’ अशी राज ठाकरे यांच्या भाषणाची नेहमीची सुरुवात असते. यावेळी त्यांनी भाषण सुरू करताना म्हटले, ‘अर्ध्या चेहऱ्याच्या झाकलेल्या आणि अर्ध्या उघड्या चेहऱ्याच्या बांधवांनो..’ त्यानंतर एकच हशा पिकला.
चिरतरुण स्वरांचा अभिषेक
‘मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश’च्या चिरतरुण स्वरांद्वारे ‘स्वरसम्राज्ञी’ आशा भोसले यांनी शिवशाहिरांना अभीष्टचिंतनानिमित्त सुरांची अनमोल भेट दिली.
बाबासाहेबांनी दिलेली महादेवाची पिंड आणि नंदी आजही माझ्या घरात आहे.
‘आशा म्हणजे पिंडीवर ठेवले जाणारे मोगऱ्याचे फूल आहे’, अशी बाबासाहेबांनी दिलेली उपमा मी आजही विसरलेली नाही. मी नेहमीच मोगऱ्याच्या फुलासारखे टवटवीत राहण्याचा आणि स्वच्छ मन ठेवण्याचा प्रयत्न करते, असे त्या म्हणाल्या.
त्यानंतर ’कानडा विठ्ठलू कर्नाटकू’ आणि ’चंदनाची चोळी अंग अंग जाळी’ अशा चैतन्यमयी सुरांमधून आशाताईंनी वातावरणात आणखी रंग भरले.
‘त्या’ ७५ वर्षांच्या वाटतंच नाहीत
आवाजाबरोबरच व्यक्तिमत्त्वही ‘चिरतरुण’ असलेल्या आशा भोसले यांचे वय किती? सत्कार सोहळ्यात हा विषय निघालाच. राज ठाकरे यांना कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी कोणीतरी म्हणाले, ‘आशाताई ७५ वर्षांच्या आहेत असं वाटतंच नाही.’ त्यावर ‘हे मला व्यासपीठावरून आवर्जून सांगावेसे वाटले,’ असे म्हणत राज ठाकरे यांनी जाहीरपणे सांगितले. यावर आशाताई चक्क लाजल्या... मग श्रोत्यांमधून कोणीतरी आशाताईंच्या खऱ्या वयाची कुजबूज केली. त्यावर आशाताईं मिश्कीलपणे म्हणाल्या, ‘असं वय सांगायचं नसतं हं.’