मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात जाणार, ही निव्वळ अफवा - सुप्रिया सुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 05:50 AM2017-08-29T05:50:59+5:302017-08-29T05:53:33+5:30
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ‘जेडीयु’सह शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील होणार असल्याची जोरदार चर्चा दिल्लीतील राजकीय वर्तुळात आहे. मात्र, खा. सुप्रिया सुळे यांनी याचा इन्कार करत या अफवा असल्याचे म्हटले आहे.
मुंबई : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ‘जेडीयु’सह शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील होणार असल्याची जोरदार चर्चा दिल्लीतील राजकीय वर्तुळात आहे. मात्र, खा. सुप्रिया सुळे यांनी याचा इन्कार करत या अफवा असल्याचे म्हटले आहे.
नितीशकुमार आणि शरद पवार ‘एनडीए’त आल्यास केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य फेरबदलात जेडीयु आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला स्थान मिळू शकते, असे वृत्त पसरल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. मात्र, या शक्यतांना भाजपामधून अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. तर, खा. सुप्रिया सुळे यांनी या वृत्ताचे तात्काळ खंडण करत ही अफवा असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादीचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनीही टिष्ट्वट करून ‘एनडीए’त जाणार नसल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही याचा इन्कार केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांचे सख्य जगजाहीर आहे. पवारांचे बोट धरूनच आपण राजकारणात आल्याचे मोदींनी जाहीर सभेत सांगितले होते. गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन आमदारांनी काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांच्याऐवजी भाजपाच्या उमेदवाराला मतदान केल्याचे म्हटले जात आहे. तर आरजेडीचे नेते लालूप्रसाद यादव यांनी रविवारी पाटण्यात आयोजित केलेल्या विरोधकांच्या महारॅलीत शरद पवार यांच्याऐवजी तारिक अन्वर यांनी हजेरी लावली. दिल्लीत चर्चेमागे ही पार्श्वभूमी असल्याचे सांगण्यात येते.
आपण मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात जाणार, ही निव्वळ अफवा असून अशा अफवा पसरविण्याचे हे उद्योग नेमकं कोण करतं, हेच कळत नाही. केंद्रीय मंत्रिमंडळात अथवा एनडीत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. -सुप्रिया सुळे, खासदार