संबंधांवर वादाचे सावट नको
By Admin | Published: June 15, 2015 02:22 AM2015-06-15T02:22:37+5:302015-06-15T02:22:37+5:30
भारत व चीन यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित व्हायचे असल्यास या संबंधांवर वाद विषयांचे सावट पडता कामा नये, असे प्रतिपादन चीनच्या नॅशनल
मुंबई : भारत व चीन यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित व्हायचे असल्यास या संबंधांवर वाद विषयांचे सावट पडता कामा नये, असे प्रतिपादन चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसचे अध्यक्ष झँग डेजियांग यांनी केले. तर राज्यातील विविध प्रांतांचा चीनमधील वेगवेगळ्या प्रांतांशी विकासाच्या दृष्टीने संबंध वृद्धिंगत होऊन दोन्ही देशांमध्ये विकासाचे नवे पर्व सुरू होईल, अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. बँक आॅफ चायनाची शाखा लवकरच मुंबईत सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
रविवारी सह्याद्री अतिथीगृहात अध्यक्ष झँग डेजियांग आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची शिष्टमंडळासमवेत चर्चा झाली. मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत चीनला भेट देण्याची संधी मिळाली तेव्हा तेथील पायाभूत सुविधा आणि विकासाची गती पाहून आपण खूप प्रभावित झालो. विशेषत: चीनमधील ४२ किलोमीटर्सचा अतिशय कमी कालावधीत पूर्ण करण्यात आलेला ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प पाहून अशाच पद्धतीने मुंबई येथील ट्रान्स हार्बर लिंक बांधून पूर्ण करण्यात आपण चिनी कंपन्यांची मदत घेणार आहोत. विकासाच्या दृष्टीने दोन देशांमध्ये सामंजस्य करार होतात, मात्र चीनच्या दौऱ्यामध्ये महाराष्ट्राने चीनमधील दुसऱ्या प्रांतांशी विकासाबाबत चर्चा करून एक नवे पर्व सुरू केले आहे. यामुळे दोन्ही देशांतील विविध प्रांतांमध्ये एक नवे सांस्कृतिक, औद्योगिक वातावरण निर्माण होईल. (विशेष प्रतिनिधी)