राज्यात १७ जूनपर्यंत पाऊस नाही : मॉन्सूनची प्रगती क्षीण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 09:12 PM2019-05-27T21:12:49+5:302019-05-27T21:26:35+5:30
मॉन्सूनची प्रगती अत्यंत धीम्या गतीने होत आहे. त्यामुळे जून महिन्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस होईल..
पुणे : राज्यातील सर्वांचे डोळे मॉन्सूनच्या आगमनाकडे लागले असले, तरी यंदाही मॉन्सून हुलकावणी देणार असल्याचे चित्र आहे. राज्यात १७ जूनपर्यंत मॉन्सूनचे आगमन होणार नाही. तसेच, जून महिन्यात सरासरी पेक्षा २० ते ३० टक्के पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाचे अभ्यासक जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे धरणसाठे जपून वापरण्याबरोबरच शेतकऱ्यांनी पेरणीची घाई देखील करु नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.
अंदमानमध्ये २० मेच्या सुमारास मॉन्सून दाखल झाला. त्यामुळे ३० मे अखेरीस केरळात आणि पुढे राज्यात मॉन्सून दाखल होण्याची अपेक्षा व्यक्त होत होती. गेली दोन वर्षे राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होत आहे. गेल्यावर्षी शेवटच्या टप्प्यात मॉन्सूनने पाठ फिरविली. तसेच, परतीचा पाऊस देखील झाला नाही. त्यामुळे यंदा पुण्यासह राज्यात टँकरद्वारे मोठ्या प्रमाणावर पाणी पुरवठा करावा लागत आहे. या शिवाय चारा छावण्या उभारण्याची वेळही आली. मात्र, यंदाही पाऊस रुसलेलाच असल्याचे दिसून येत आहे.
कुलकर्णी म्हणाले, मॉन्सूनची प्रगती अत्यंत धीम्या गतीने होत आहे. त्यामुळे जून महिन्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस होईल. जूनमध्ये कोकणात सरासरी ६८ सेंटीमीटर पाऊस पडतो. मात्र, ४८ ते ८८ सेंटीमीटर दरम्यान पाऊस झाल्यास तो साधारण मानला जातो. मध्यमहाराष्ट्रात सरासरी १३ सेंटीमीटर पडतो. तर, ८ ते १७ सेंटीमीटर पाऊस कमी जास्त होण्याची अक्यता असते. यंदा कोकणात २०, मध्यमहाराष्ट्रात ७ ते ८, मराठवाडा ८ ते ९ आणि विदर्भात १० सेंटीमीटर पाऊस होईल. एकूणच राज्यात १७ जून पर्यंत पाऊस होण्याची शक्यता नाही. पाऊस झाल्यास तो १ सेंटीमीटरच्या आसपास राहील. हा पाऊस शेतीच्या मशागतीसाठी देखील उपयुक्त नाही. जूनमध्ये पाऊस होणार नसल्याने धरणसाठ्याचे नियोजन केले पाहीजे. तसेच, शेतकऱ्यांनी देखील लवकर पेरणी करु नये.
-------------
एल निनोची स्थिती सामान्य आहे. मॉन्सून सक्रिय राहण्यासाठी समुद्राचे तापमान, हवेचा वेग असे विविध घटक कारणीभूत असतात. समुद्राच्या पृष्ठभाग सरासरी २८ ते २९ डीग्री असते. हिंद महासागराच्या पूर्व भागाचे तापमान १ अंशाने कमी आणि पश्चिम भागाचे तापमान एक अंशाने जास्त असावे लागते. तसेच, मॉन्सून पुढे जाण्यासाठी वाऱ्याचा वेगही योग्य असावा लागतो. आत्ता तशी स्थिती नाही. त्यामुळे जूनमधे सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल.
जीवनप्रकाश कुलकर्णी, हवामानतज्ज्ञ