राज्यात दोन आठवडे पाऊस नाही; विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेची लाट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 03:17 AM2019-05-31T03:17:35+5:302019-05-31T06:28:36+5:30
६ ते १२ जून या कालावधीत ईशान्य भारत आणि दक्षिण कर्नाटकच्या भागात पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
पुणे : राज्यात १२ जूनपर्यंत पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यामुळे आभाळाकडे तोंड लावून बसलेल्या बळीराजाला आणखी दोन आठवडे पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
हवामान विभागाने येत्या १२ जूनपर्यंतच्या पावसाचा अंदाज गुरुवारी (दि. ३०) जाहीर केला. २० मे च्या सुमारास अंदमान आणि निकोबार बेटांवर मॉन्सूनचे आगमन झाले. मात्र, प्रतिकूल परिस्थितीमुळे मॉन्सूनची पुढील वाटचाल थांबलेली आहे. केरळमध्येही मॉन्सूनचे आगमन झालेले नाही. मात्र, स्थानिक स्थितीमुळे केरळासह महाराष्ट्रातील काही भागात येत्या सप्ताहात पावसाच्या काही सरी कोसळतील.
येत्या आठवड्यात ईशान्य भारतात जोरदार पाऊस कोसळेल, बिहार, झारखंड, दक्षिण कर्नाटकातील काही भाग, केरळ आणि लक्षद्वीप येथे तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. ६ ते १२ जून या कालावधीत ईशान्य भारत आणि दक्षिण कर्नाटकच्या भागात पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
वळवाच्या पावसाची पाठ
देशात १ मार्च ते २९ मे या कालावधीत होणाऱ्या पावसात २४ टक्के घट झाली आहे. देशात या काळात सरासरी १२६.६ मिलिमीटर पाऊस पडतो. आत्तापर्यंत देशभरात सरासरी ९६.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. उत्तर पश्चिम भारतात ७८ मिलिमीटर (२९ टक्के घट), मध्यभारतात ३१.७ (१७ टक्के घट), दक्षिण भारतात ६१.८ (४८ टक्के घट) आणि ईशान्य भारतात ३१२.५ मिलिमीटर (१२ टक्के घट) पाऊस झाला आहे.