वर्ष उलटूनही रेशनकार्ड नाही

By admin | Published: May 14, 2014 05:53 AM2014-05-14T05:53:44+5:302014-05-14T05:53:44+5:30

वर्ष, दीड वर्षे उलटूनही रेशनकार्ड न मिळाल्याने संतप्त नागरिकांनी निगडीच्या ‘अ’ परिमंडळ कार्यालयाचे अधिकारी विठ्ठल जाधव यांना घेराव घातला. गोंधळामुळे पोलिसांना पाचारण करावे लागले.

There is no ration card even after a year | वर्ष उलटूनही रेशनकार्ड नाही

वर्ष उलटूनही रेशनकार्ड नाही

Next

पिंपरी : वर्ष, दीड वर्षे उलटूनही रेशनकार्ड न मिळाल्याने संतप्त नागरिकांनी निगडीच्या ‘अ’ परिमंडळ कार्यालयाचे अधिकारी विठ्ठल जाधव यांना घेराव घातला. गोंधळामुळे पोलिसांना पाचारण करावे लागले. शेवटी नमते घेत अधिकार्‍यांनी १० जूनपर्यंत रेशनकार्ड देण्याचे लेखी कबूल केल्याने नागरिक शांत झाले. साईनाथनगर, निगडी येथील अधिकृत महा ई-सेवा केंद्रात सुमारे १०० नागरिकांनी रेशनकार्ड नवीन काढणे, विभक्त करणे व नूतनीकरणासाठी अर्ज केले होते. गेल्या वर्षी २३ मार्चपर्यत २२ जणांनी, जानेवारी महिन्यात ६६ व मार्च महिन्यात २१ जणांचे अर्ज आहेत. या कामास ३० दिवसांची मुदत असताना त्यास वर्ष, दीड वर्षे लागत असल्याने संतप्त नागरिक सेवा केंद्रचालकास धारेवर धरत होते. नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देता देता त्यांना घाम फुटत होता. या संदर्भात त्यांनी परिमंडल अधिकारी विठ्ठल जाधव यांना ३ ते ४ वेळा भेटून काम करण्याची विनंती केली. मात्र, रेशनकार्ड उपलब्ध नाहीत, मनुष्यबळ कमी आहे, निवडणुकीचे काम सुरू आहे, अन्नधान्य सुरक्षा योजनाचे शिक्के मारण्याचे काम सुरू आहे, अशी विविध उत्तरे देऊन त्यांची बोळवण करीत होते, असे केंद्रचालक रोहित टेकवडे व नागरिकांनी सांगितले. मात्र, एजंटास दोन हजार रुपये दिल्यास तो एका दिवसात रेशनकार्डचे काम करीत होता. याचा टेकवडे यांनी स्वत: अनुभव घेतला. त्यामुळे त्यांनी आज अर्जदार नागरिकांना बोलावून घेऊन दुपारी साडेतीनच्या सुमारास जाधव यांना कार्यालयात घेराव घातला. संतप्त नागरिकांनी जाधव यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. एजंटांचे काम एका दिवसात होते, तर रीतसर अधिकृत केंद्रातून अर्ज करूनही काम का होत नाही, असे विचारत गोंधळ घातला. गोंधळ वाढल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. नागरिकांच्या रोषापुढे नमते घेत जाधव यांनी पुढील महिन्यात १० तारखेस सर्व अर्जदारांचे रेशनकार्ड बनवून देण्याचे लेखी आश्वासन दिले. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर नागरिक शांत झाले. निगडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाईक पाटील यांनी सांगितले, ‘‘अर्ज आलेल्या तारखेप्रमाणे प्राधान्यक्रम ठरवून कामे करण्याची सूचना केली आहे. रीतसर आलेल्या नागरिकांची कामे केली जावीत. कामासाठी पैसे मागणार्‍या एजंटवर कारवाई करण्यात येणार आहे. एजंट पैसे मागत असल्यास निगडी पोलिसांशी संपर्क साधावा. सरकारी कामात अडथळा आणणार्‍या एजंटबाबत तक्रार दिल्यास त्वरित कारवाई केली जाईल. केवळ पत्र देऊन हा प्रश्न सुटणार नाही.’’ (प्रतिनिधी)

Web Title: There is no ration card even after a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.