धर्माच्या आधारे आरक्षण नाहीच-तावडे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 01:32 AM2019-06-22T01:32:02+5:302019-06-22T06:41:22+5:30
मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून शुक्रवारी विधान परिषदेत काही काळ गदारोळ झाला.
मुंबई : मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून शुक्रवारी विधान परिषदेत काही काळ गदारोळ झाला. मुस्लिम आरक्षणाची आग्रही मागणी विरोधकांनी केली. तर, मुस्लिम समाजातील मागास प्रवर्गाला आजही आरक्षण आहे. मग धर्माच्या आधारावर आरक्षण हवेच कशाला, असा सवाल अल्पसंख्याक मंत्री विनोद तावडे यांनी विरोधकांना केला.
मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकरीत पाच टक्के आरक्षण देण्याची मागणी करणारी लक्षवेधी सूचना काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी मांडली. समाजातील सर्व घटकांच्या हिताचे रक्षण करण्याबाबत आमचे सरकार संवेदनशील आहे. मात्र, राज्यघटनेत धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सत्तेत असताना काँग्रेसने मुस्लिमांच्या विकासासाठी काहीही केलेले नाही. म्हणूनच लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर, ओवेसी हे तुमचे सगळे ‘वंचित’ घेऊन गेले. काँग्रेस मतांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावरून भरकटल्याचा आरोपही तावडे यांनी केला.
मुस्लिम समाजाला मुस्लिम शैक्षणिक संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षण मिळते. तसेच मुस्लिम समाजातील आरक्षित पोटजातींना आरक्षणाचा लाभ मिळत असल्याच्या तावडे यांच्या दाव्यावर शरद रणपिसे यांनी आक्षेप घेतला. मंत्री दिशाभूल करत असल्याचा आरोप केल्याने सभागृहात गोंधळ निर्माण झाला. तालिका सभापती हुस्नबानो खलिफे यांनी पाच मिनिटांसाठी सभागृह स्थगित केले होते.