विसर्जन मिरवणुकीत वाजवा रे वाजवा... आवाजावर आता मुंबईसह राज्यभरात कोणतेही बंधन नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 04:08 AM2017-09-05T04:08:29+5:302017-09-05T04:47:48+5:30
केंद्र सरकारने जारी केलेल्या सुधारित ध्वनिप्रदूषण नियमावलीस तहकुबी देत, राज्यात ‘शांतता क्षेत्रां’ची बंधने लागू करणा-या मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने...
नवी दिल्ली : केंद्र सरकारने जारी केलेल्या सुधारित ध्वनिप्रदूषण नियमावलीस तहकुबी देत, राज्यात ‘शांतता क्षेत्रां’ची बंधने लागू करणा-या मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने मुंबईसह राज्यभर मंगळवारी सार्वजनिक गणपतींचे विसर्जन लाऊडस्पीकर व बॅण्डबाजांसह दणक्यात होऊ शकेल.
न्यायालयाच्या सोमवारच्या निर्णयाने राज्य सरकारने नव्याने अधिसूचना काढल्याखेरीज राज्यात ‘शांतता क्षेत्र’ लागू होणार नाही. धार्मिक स्थळे, इस्पितळे, न्यायालये व शाळांच्या १०० मीटर परिसरात मोठा आवाज करण्यावर व अन्यत्र रात्री १० नंतर लाऊडस्पीकर लावण्यावर बंधने नसतील. त्यामुळे श्री विसर्जन मिरवणुका स्थळकाळाच्या मर्यादांशिवाय धडाक्यात काढता येतील. उच्च न्यायालयाने ‘शांतता क्षेत्र’ व इतरत्र रात्री १० नंतर मोठा आवाज केला, म्हणून संबंधितांवर कायद्याचा बडगा न उगारण्याची मुभा दिली होती. परंतु त्यामुळे नियमांचे बंधन कायम राहून उत्साही उन्मादावर विरजण पडून प्रसंगी खटके उडण्याची जी शक्यता होती, तीही दूर झाली आहे.
तर देशात कुठेच लाऊडस्पीकर लावता येणार नाहीत...
अजय मराठे आणि डॉ. महेश विजय
बेडेकर या पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी जनहित याचिका करून केंद्र सरकारच्या
नव्या अधिसूचनेस आव्हान दिले. त्याला उच्च न्यायालयाने १ सप्टेंबर रोजी हंगामी स्थगिती दिली होती.
केंद्र सरकारच्या अधिसूचनेचा असा शब्दश:
अर्थ लावल्यास, देशात कुठेच लाऊडस्पीकर लावता येणार नाहीत, असा युक्तिवाद राज्य सरकारने केला. याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ
वकील चंदर उदय सिंग यांनी अधिसूचना
चुकीची असल्याचे म्हटले़
सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्रा, न्या. अजय खानविलकर व न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने मराठे व बेडेकर यांना नोटिसा काढून दोन आठवड्यांत उत्तरे देण्यास सांगून हायकोर्टाच्या अंतरिम आदेशास स्थगिती दिली.
मुंबईत पाच हजार सीसीटीव्हींद्वारे नजर-
बाप्पाचा विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. विसर्जन सोहळ्यातील घडामोडींवर पोलिसांची नजर असणार आहे. त्यासाठी ड्रोन तसेच पाच हजार सीसीटीव्ही कॅमेºयांद्वारे या विसर्जन सोहळ्यावर ‘वॉच’ ठेवण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी दिली.
गणेशभक्तांनी लाडक्या बाप्पाची सेवा केल्यानंतर मंगळवारी शहरातील ११९ ठिकाणी बहुतांश मोठ्या बाप्पांसह घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात येणार आहे. त्यामुळे पोलिसांनी शहरात विशेष बंदोबस्ताची आखणी केली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेसोबतच सुरक्षेसाठी सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर
यांनी सोमवारी चौपाट्यांची पाहणी करत सुरक्षेचा आढावा घेतला. मुंबई पोलीस दलातील ३५ हजार अधिकारी आणि जवानांच्या दिमतीला केंद्रीय व राज्य राखीव बलाच्या १२ तुकड्या तैनात ठेवण्यात
आल्या आहेत.
चोरांपासून सावधान...
गर्दीचा गैरफायदा घेत
चोर, लुटारू या गर्दीत सहभागी होतात. अशा
वेळी भाविकांनी त्यांच्या सामानाची काळजी घेण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. तसेच कुठे
काही संशयास्पद वस्तू आढळल्यास थेट पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
विसर्जन मिरवणुका, चौपाट्या या ठिकाणी साध्या गणवेशातील पोलीस भाविक बनून सहभागी होणार आहे. गर्दीत कोणी महिलांसोबत असभ्य वर्तन करताना आढळल्यास त्यांची रवानगी कोठडीत करण्यात येईल.