सासऱ्याच्या स्वअर्जित घरावर सुनेचा हक्क नाही
By admin | Published: December 8, 2015 02:27 AM2015-12-08T02:27:24+5:302015-12-08T02:27:24+5:30
सासऱ्याने स्वत:च्या पैशाने आणि स्वत:च्या वास्तव्यासाठी खरेदी केलेल्या घरावर सून कोणताही हक्क सांगू शकत नाही. तसेच लग्न होऊन मी त्या घरात आलेली असल्याने व पतीही तेथेच राहात असल्याने मीही तेथेच राहणार
मुंबई : सासऱ्याने स्वत:च्या पैशाने आणि स्वत:च्या वास्तव्यासाठी खरेदी केलेल्या घरावर सून कोणताही हक्क सांगू शकत नाही. तसेच लग्न होऊन मी त्या घरात आलेली असल्याने व पतीही तेथेच राहात असल्याने मीही तेथेच राहणार, असेही ती म्हणू शकत नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
भारती राजेश भावे या विवाहितेने केलेले अपील फेटाळताना न्या. रमेश धानुका यांनी हा निकाल दिला. भारती यांचे सासरे विजय शंकर भावे (वय ७७ वर्षे) आणि सासू वसुधा भावे यांनी केलेल्या दाव्यात शहर दिवाणी न्यायालयाने भारती यांनी आपल्या मुलासह दोन महिन्यांत सासऱ्याचे घर सोडून निघून जावे, असा अंतरिम आदेश ३ आॅक्टोबर रोजी दिला होता. त्याविरुद्ध भारती यांनी अपील केले होते. भारती या विजय भावे यांच्या स्नुषा असल्या आणि लग्न झाल्यापासून त्या पतीसोबत याच घरात राहात असल्या तरी छेडा नगर, विक्रोळी येथील अजंता ओम उमा महेश्वर सोसायटीमधील फ्लॅट त्यांच्या सासऱ्याने स्वत:ला राहण्यासाठी व पूर्णपणे स्वत:च्या पैशांनी खरेदी केलेला असल्याने तो फ्लॅट भारती यांचे ‘सासरचे घर’ (मॅट्रिमोनिअल हाऊस) होऊ शकत नाही. परिणामी भारती या फ्लॅटवर कोणताही हक्क सांगू शकत नाहीत किंवा (सासू-सासऱ्यांची इच्छा नसताना) त्याच घरात राहण्याचा हट्टही धरू शकत नाहीत, असे न्या धानुका यांनी नमूद केले.
दिवाणी न्यायालयाने दाव्यामध्ये अंतिम स्वरूपाचा आदेश अंतरिम टप्प्याला देऊ नये, हे सर्वसाधारणपणे खरे असले तरी न्यायालयास तसा अधिकार नाही, असे नाही. आजारी असलेल्या सासू-सासऱ्यांशी भारती नीट वागत नाहीत व प्रसंगी त्यांच्या अंगावर हातही उगारतात हे पाहता, या प्रकरणात अंतरिम टप्प्यालाही त्यांना घराबाहेर काढण्याचा आदेश पूर्णपणे समर्थ नीय ठरतो, असे न्या. धानुका यांनी म्हटले. दिवाणी न्यायालयाने भारती यांना सर्व सामानसुमान घेऊन मुलासह घरातून निघून जाण्यास ३ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. उच्च न्यायालयाने ही मुदत आणखी एक महिन्याने वाढवून दिली.
या अपिलाच्या सुनावणीत भारती यांच्यासाठी अॅड. विश्वजीत कापसे यांनी तर त्यांचे सासरे, सासू व पतीसाठी अॅड. उमा वागळे यांनी काम पाहिले.
(विशेष प्रतिनिधी)
सुनेचे सर्व मुद्दे फेटाळले -
विक्रोळी येथील राहता फ्लॅट सासरे व पती यांनी दोघांनी मिळून खरेदी केल्याचे भारती यांचे म्हणणे होते. परंतु भारती यांच्या पत्नीने स्वत: प्रतिज्ञापत्र करून याचा इन्कार केला. एवढेच नव्हे, तर सासऱ्यांनी हा फ्लॅट १९७४मध्ये खरेदी केला तेव्हा भारती यांचे पती राजेश हे अवघे सात वर्षांचे होते. त्यामुळे त्यांनी फ्लॅटसाठी पैसे देण्याचा प्रश्नच येत नाही, असे न्यायालयाने म्हटले.या राहत्या फ्लॅटमधून बाहेर काढले तर, पर्यायी घराची कोणतीही सोय नसल्याने आपण आणि आपला मुलगा रस्त्यावर येऊ, असे भारती यांचे म्हणणे होते. परंतु तिच्या माहेरच्यांचे अलिबागला स्वत:चे घर आहे व भावाचे कुलाब्यात घर आहे. तेथे त्या जाऊ शकतात, असे न्यायालयाच्या निदर्शनास आले.भारती या जीपीओमध्ये नोकरीस आहेत व त्यांना ६५ हजार रुपये पगार आहे. त्यामुळे त्या स्वत:चे घर घेऊनही राहू शकतात, असे न्यायालयाने म्हटले.एक विवाहित स्त्री म्हणून भारती ‘सासरच्या घरा’चा हक्क त्यांच्या पतीविरुद्ध सांगू शकतात, सासऱ्यांविरुद्ध नाही, असेही न्यायालयाने म्हटले.