जावई पडल्याचं दुःख नाही, तेवढं दुःख खैरे पडल्याचं - रावसाहेब दानवे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 02:33 PM2019-05-24T14:33:32+5:302019-05-24T15:02:11+5:30
या निवडणुकीत चंद्रकांत खैरे उमेदवार नव्हते, तर नरेंद्र मोदी उभे होते.
मुंबई : औरंगाबाद लोकसभेतील शिवसेनेचे उमेदवार खा. चंद्रकांत खैरे यांना 31 वर्षांच्या राजकारणात पहिल्यांदाच पराभवाचा धक्का बसला आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जावई पडल्याचे दु:ख नाही, तेवढे दु:ख चंद्रकांत खैरे पडल्याचे म्हटले आहे.
चंद्रक्रांत खैरे यांच्या पराभवानंतर रावसाहेब दानवे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या निवडणुकीत जावई पडल्याचे दु:ख नाही, तेवढे दु:ख चंद्रकांत खैरे पडल्याचे आहे. मी स्वतः भाकित केले होते की चंद्रकांत खैरे निवडून येतील. मात्र, काही राजकीय गणितं चुकतात, असे रावसाहेब दानवे म्हणाले. तसेच, या निवडणुकीत चंद्रकांत खैरे उमेदवार नव्हते, तर नरेंद्र मोदी उभे होते.
याचबरोबर, पक्ष संघटनेने चांगली कामे केली म्हणून आम्ही जिंकलो असे सांगत पहिल्यांदा सरकार स्थापन करणार, त्यानंतर विधानसभेच्या तयारीला लागणार असल्याचे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. तसेच, या निवडणुकीत अपयश मिळालेल्या काँग्रेसवर टीका करताना रावसाहेब दानवे म्हणाले, राज्यात आता काँग्रेसला एकही उमेदवार मिळणार नाही, यासाठी त्यांनी जाहिरात द्यावी लागेल.
दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला असून त्यांच्या पराभवाला रावसाहेब दानवे यांचे जावई आणि उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी मोठा हातभार लावला. हर्षवर्धन जाधव हे या निवडणुकीचे गेमचेंजर ठरले असून, या निवडणुकीत आ. इम्तियाज जलील यांनी बाजी मारजी आहे.
शिवसेनेची पहिली शाखा मराठवाड्यात स्थापन झाल्यानंतर चंद्रकांत खैरे यांनी ज्या निवडणुका लढविल्या त्या जिंकल्या. ही निवडणूक मात्र त्यांच्यासाठी घाम काढणारी ठरली. पक्षातील गटबाजी आणि अपक्ष उमेदवार जाधव यांनी ‘कास्टकार्ड’च्या आधारे खैरेंविरोधात आघाडी उघडली. भाजपानेदेखील हातचे राखून काम केले. खा. रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्यासाठी पूर्ण भाजपने काम केल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी मतमोजणीपूर्वी केला होता. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील जाधव यांना मदतीचा हात दिल्यामुळे चंद्रकांत खैरेंनी आखलेली रणनीती कोलमडली, याचाच फायदा आ. जलील यांना झाला, त्यांनी अतिशय भूमिगत पद्धतीने प्रचारतंत्र वापरून शिवसेनेच्या हिंदू-मुस्लिम या पारंपरिक राजकारणाला छेद देत विजयश्री खेचून आणली. या सगळ्या धामधुमीत काँग्रेसचे उमेदवार आ. सुभाष झांबड यांना १ लाख मतांचा पल्ला गाठता आला नाही.
१९८० नंतर मुस्लिम समुदायाला संधी
मुस्लिम समुदायाला १९८० नंतर खासदारपदी विराजमान होण्याची संधी आ. इम्तियाज जलील यांच्या रूपाने मिळाली आहे. ३९ वर्षांनंतर सोशल इंजिनिअरिंगच्या राजकारणाचा पॅटर्न राबवून भारिपचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे खा. असदोद्दीन ओवेसी यांनी वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने नवीन राजकीय समीकरणाची पायाभरणी औरंगाबादेत केली. त्याचे फळ म्हणून आ. जलील यांना ऐतिहासिक विजय मिळविता आला.
विजयाची कारणे अशी-
१) दलित-मुस्लिम मतांच्या जादूचा एमआयएमला लाभ.
२) अपक्ष उमेदवार जाधव यांनी खैरेंचे मतदान फोडले.
३) ग्रामीण भागातील मतदान काँग्रेसकडे गेले नाही.
४) शहरातील नागरी समस्यांमुळे खैरेंना विरोध.
५) शिवसेनेच्या मतविभाजनामुळे एमआयएम एकतर्फी जिंकले.
चंदक्रांत खैरे यांच्या पराभवाची कारणे
१) पारंपरिक प्रचार पद्धतीनेच मतदान मागितले.
२) मनपातील राजकारणात ढवळाढवळीचा फटका.
३) नवमतदारांच्या मनातील कल जाणून घेतला नाही.
४) विकासाऐवजी सांप्रदायिक मुद्यांवर प्रचार.
५) नाडी-पुडी, सबसे बड़ा बाबा या उपाधींमुळे अंधश्रद्धांध म्हणून टीका.
माझे बॅड लक असल्याचे म्हणाले, चंदक्रांत खैरे...
पराभव होणार असल्याचे २३ व्या फेरीअंती चंदक्रांत खैरे यांच्या लक्षात आले होते; परंतु देवावर विश्वास आहे, निश्चित काहीतरी चांगला निकाल लागेल, असे चंदक्रांत खैरे म्हणाले; परंतु पुढील फे-याअंती निकाल येताच माझे बॅड लक आहे, असे सांगून त्यांनी मतमोजणी केंद्र सोडले.
२१ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
निवडणुकीत २४ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी २१ उमेदवारांना एकूण मतदानाच्या १६ टक्केमतदान घेता आले नाही. त्यामुळे त्यांची अनामत रक्कम (डिपॉझिट) जप्त झाले.