सहा महिन्यांपासून पगारच नाही
By admin | Published: July 18, 2015 02:14 AM2015-07-18T02:14:57+5:302015-07-18T02:14:57+5:30
महाराष्ट्र राज्य सहकारी संघातील सुमारे ३५० कर्मचाऱ्यांना गेल्या सहा महिन्यांपासून पगारच मिळालेला नाही. परिणामी चार दिवसांत पगार दिला नाही, तर २१ जुलैपासून कर्मचारी काम बंद
मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी संघातील सुमारे ३५० कर्मचाऱ्यांना गेल्या सहा महिन्यांपासून पगारच मिळालेला नाही. परिणामी चार दिवसांत पगार दिला नाही, तर २१ जुलैपासून कर्मचारी काम बंद करून बेमुदत उपोषण सुरू करतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य सहकारी सेवक कृती संघटनेने दिला आहे.
संघटनेने शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले, की गेल्या ९७ वर्षांपासून राज्यातील सहकारी संस्था आणि बँकांमधील कर्मचाऱ्यांना सहकाराचे प्रशिक्षण देण्याचे काम संघ करीत आहे. पूर्वी १०० टक्के अनुदान मिळणाऱ्या या संस्थेचे अनुदान शासनाने काही वर्षांपूर्वी बंद केले. तरीही शिक्षण निधीच्या जोरावर संघाचे काम सुरू होते. एकट्या मुंबईतून शिक्षण निधीतून संघ सव्वा कोटी रुपये महसूल गोळा करीत होता. तर राज्यातून शिक्षण निधीच्या माध्यमातून ६ कोटी रुपये गोळा होत होते. मात्र २०१३ साली शासनाने नियमांत बदल करीत सहकारी शिक्षण व प्रशिक्षण बंधनकारक केले. शिक्षण निधीऐवजी शिक्षण
प्रशिक्षण निधीची तरतूद केली. मात्र सरकारने या संस्थेसोबतच अन्य सहा संस्थांना अधिसूचित केले.
शिवाय प्रशिक्षणाचे दरही ठरवण्यात आले नाही.
त्यामुळे संघाला मिळणारा उत्पन्नाचा मार्गच बंद झाल्याचे संघाचे म्हणणे आहे. परिणामी जानेवारी २०१५ पासून येथील कर्मचाऱ्यांना पगारच मिळाला नसल्याचे संघटनेने सांगितले.
सहकार आणि वस्त्रोद्योग विभागाने १०० टक्के अनुदान देत कर्मचाऱ्यांचे पगार अदा करण्याची मागणी संघटनेने केली आहे. शिवाय कर्मचाऱ्यांना पाचव्या वेतन आयोगानुसार तरी पूर्ण पगार द्यावा, अशी मागणी केली आहे अन्यथा २१ जुलैपासून संघटनेचे कर्मचारी आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू करतील. (प्रतिनिधी)
संघटनेचा आरोप
एकीकडे अधिसूचित केलेल्या संस्थांना अनुदान मिळत असताना महाराष्ट्र राज्य सहकारी संघाला मात्र अनुदानापासून दूर ठेवण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे. नव्या नियमांत शिक्षण व प्रशिक्षण बंधनकारक ठेवण्यात आले नाही.