शालेय प्रवेशाचे वेळापत्रक नाहीच
By Admin | Published: January 16, 2015 05:50 AM2015-01-16T05:50:18+5:302015-01-16T05:50:18+5:30
राज्य शिक्षण मंडळ तसेच सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळांच्या प्रवेशाचे वेळापत्रक वेगवेगळे असून, सर्व शाळांनी एका विशिष्ट कालावधीमध्येच प्रवेश प्रक्रिया राबवावी
पुणे : राज्य शिक्षण मंडळ तसेच सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळांच्या प्रवेशाचे वेळापत्रक वेगवेगळे असून, सर्व शाळांनी एका विशिष्ट कालावधीमध्येच प्रवेश प्रक्रिया राबवावी, असे बंधन शाळांवर घालता येणार नाही. मात्र, शुल्क नियंत्रण कायद्यानुसार सर्व शाळांवर शुल्क आकारणीबाबत निर्बंध घालता येतील, असे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी सांगितले. परिणामी, पाल्यांच्या शाळाप्रवेशासाठी पालकांना करावी लागणारी फरफट यापुढील काळातही थांबणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
पाल्याच्या शाळाप्रवेशासाठी पालकांना नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यापासूनच तयारीला लागावे लागते. अलीकडच्या काळात बहुतांश शाळांनी आॅनलाइन प्रवेश अर्ज उपलब्ध करून दिले आहेत. परंतु, केवळ प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी पालकांना शाळांच्या प्रवेशद्वारावर पहाटेपासूनच रांगा लावाव्या लागत होत्या. त्यातही सीबीएसई व आयसीएसई बोर्ड स्वतंत्रपणे प्रवेश प्रक्रिया राबवितात. परिणामी, शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांची फरफट होते. मात्र, काही वर्षांपासून सर्व शाळांच्या प्रवेशाचे एकच वेळापत्रक असावे, याबाबत शालेय शिक्षण विभागातर्फे चर्चा केली जात आहे. या पार्श्वभूमीवर तावडे यांना विचारले असता, प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रतक तयार करण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण परिषद, बालभारतीच्या अभ्यास मंडळाच्या सदस्यांची तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सदस्यांची गुरुवारी बैठक घेण्यात आली. त्यात अभ्यास मंडळाच्या सदस्यांच्या निवडीबाबत आॅनलाइन यंत्रणा उभी करण्याचा निर्णय घेण्यात आला.