एसटीत अजूनही ‘शिवशाही’ अवतरलीच नाही

By admin | Published: May 7, 2016 02:19 AM2016-05-07T02:19:11+5:302016-05-07T02:19:11+5:30

एसटी महामंडळाने मोठा गाजावाजा करीत भाडेतत्त्वावरील ‘एसी शिवशाही’ बसेसची घोषणा केली. मात्र ही घोषणा करून तीन महिने उलटले तरी या बस अद्याप ताफ्यात दाखल

There is no 'Shivshahi' in ST still | एसटीत अजूनही ‘शिवशाही’ अवतरलीच नाही

एसटीत अजूनही ‘शिवशाही’ अवतरलीच नाही

Next

- सुशांत मोरे,  मुंबई
एसटी महामंडळाने मोठा गाजावाजा करीत भाडेतत्त्वावरील ‘एसी शिवशाही’ बसेसची घोषणा केली. मात्र ही घोषणा करून तीन महिने उलटले तरी या बस अद्याप ताफ्यात दाखल झाल्या नाहीत. गर्दीचा हंगाम सुरू झाला असून, शिवशाही बस याच हंगामात सुरू करण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाचा होता.
एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्या १७ हजार बस आहेत. यात जवळपास १00 पेक्षा जास्त एसी बस असून मुंबई ते पुणे, औरंगाबादसह अन्य काही मोजक्याच मार्गांवर त्या धावतात. प्रवाशांना चांगल्या प्रकारे सुविधा मिळावी आणि जास्तीत जास्त प्रवाशांना एसी बस उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आणखी काही एसी बसेस ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी घेतला होता. त्यानुसार ४५ आसनी एसी बस आणि ३0 आसनी स्लीपर एसी बस या दोन सेवा प्रकारांचा समावेश असलेल्या ५00 बस भाडेतत्त्वावर घेण्याची प्रक्रिया सुरू केली. या बस ताफ्यात आणण्यापूर्वी त्यांचे ‘शिवशाही’ असे नामकरणही करण्यात आले.
२0१६ च्या जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त परिवहन विभाग आणि एसटी महामंडळाच्या संयुक्ताने मुंबई सेन्ट्रल येथे काही योजनांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. अजूनही एसटीच्या ताफ्यात एकही शिवशाही बस दाखल झालेली नाही. याबाबत एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांना विचारले असता, एकही शिवशाही एसी बस एसटीच्या ताफ्यात दाखल झाली नसल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र त्याची प्रक्रिया सुरू आहे. शिवशाही बस या टप्प्याटप्प्यात १५ ते २0 या प्रमाणे एसटीच्या ताफ्यात लवकरच दाखल होतील, असे ते म्हणाले.

Web Title: There is no 'Shivshahi' in ST still

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.