पाण्याअभावी रोहिणी नक्षत्राचा पेराच नाही

By admin | Published: May 30, 2016 01:38 AM2016-05-30T01:38:03+5:302016-05-30T01:38:03+5:30

भोर तालुक्यातील शेतकरी उन्हातान्हाचा विचार न करता खाचरांची बांधबंधिस्ती करून राने तयार करून रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणीसाठी आतुरतेने वाट पाहतो.

There is no sine of Rohini nakshatra due to water | पाण्याअभावी रोहिणी नक्षत्राचा पेराच नाही

पाण्याअभावी रोहिणी नक्षत्राचा पेराच नाही

Next


भोर : रोहिणीचा पेरा मोत्याचा तुरा या पारंपरिक समजप्रमाणे भोर तालुक्यातील शेतकरी उन्हातान्हाचा विचार न करता खाचरांची बांधबंधिस्ती करून राने तयार करून रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणीसाठी आतुरतेने वाट पाहतो. मात्र यंदा ही परंपरा खंडित झाली आहे. वळवाच्या पावसाने हुलकावणी दिल्याने पेरणीसाठी रान तयार असतानाही शेतात धूळवाफेवर पेरणी करण्याचे धाडस शेतकरी करीत नाही. आकाशाकडे डोळे लावून बळीराजा पावसाची आतुरतेने वाट पाहतोय
खरीप हंगामातील भाताच्या पिकासाठी शेतकऱ्यांनी जमिनीची बांधबंधिस्ती नांगरणी उखळणी करून तरवे भाजून रान तयार करून ठेवले आहे. मंगळवारी २४ मे रोजी रोहिणी नक्षत्र निघाले खरे; पण मात्र मागील तीन महिन्यांत एक-दोन पाऊस वगळता एकही वळवाचा पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू होण्याऐवजी आभाळाकडे डोळे लावून शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहत असल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे. रोहिणी नक्षत्रात पेरलेले भाताचे पीक शेतकऱ्याच्या दृष्टीने मोत्यापेक्षा श्रेष्ठ असते. जमीन तापलेली असते, हवेतही उष्मा असतो आणि अशा वेळी जर बी धूळवाफेवर पेरले (टोकणले) तर ते तरतरून उठते. पीक जोमाने उभे राहते. त्यामुळे रोहिणी नक्षत्राच्या पेरणीला शेतकऱ्यांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान असते.
रोहिणी नक्षत्र निघण्याआधी वळवाचा जोरदार पाऊस झालेला असतो. या पावसामुळे रानांच्या मशागतीही आटोपलेल्या असतात. रान चांगल्या प्रकारे तयार असते. रोहिणी नक्षत्र निघाले की पेरणीला सुरुवात करायची, अशी गणिते ठरलेली असतात. त्यासाठी प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी वेगवेगळी बियाणे, खते घरी आणून ठेवली आहेत. धूळवाफेवरच्या पेरण्यांसह भात नाचणीचे तरवे टाकण्याचे कामही याच मुहूर्तावर करतात. घराभोवतीच्या परसबागेतही भोपळा, दोडका, कारली, राजगिरा, भेंडी, मेथी यांसारख्या वेगवेगळ्या पालेभाज्यांची अळी घातली जातात. गौरीगणपती आणि दसऱ्याच्या सणाला या भाज्या भरपूर प्रमाणात येता. पावसाळ्यात भाज्यांची गरज घरातील परसबागेतच भागवली जाते. हे यामागचे आर्थिक गणित होते, असे आपटी गावचे माजी सरपंच व वयोवृद्ध शेतकरी जानबा पारठे यांनी सांगितले.
जमीन पाण्यासाठी आसुसलेली. अशा भयानक परिस्थितीत तारखेप्रमाणे रोहिणी नक्षत्राचे आगमन झाले नाही. आणि आगमनाला आभाळात एक ढगही नाही की पावसाचा थेंबही पडलेला नाही. यंदा मॉन्सून मोठ्या प्रमाणात बसरणार, अशी भाकिते केली जातात. मात्र तो बरसणार कधी, याचा अंदाज कुणालाही आलेला नाही. मात्र, वळवाच्या पावसाअभावी भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील धूळवाफेवरच्या पेरण्या रखडल्या आहेत. (वार्ताहर)
४\भोर तालुक्याची लोकसंख्या १७१७१९ असून १९८ गावे आहेत. त्यातील खरिपाची १५५ गावे असून, एकूण खातेदार ५३८९६ आहेत. तालुक्यातील भात हे प्रमुख पीक असून ७८०० हेक्टरवर भाताचे तर त्याखालोखाल नाचणीचे पीक ३९०० हेक्टरवर घेतले जाते. तृणधान्य १०९०० हे, कडधान्य १००० हे, गळीत धान्य ७२०० हे, सोयाबीन २५०० हेक्टरवर घेतले जाते. खरीप हंगाम २०२०० हेक्टरचा असून, तालुक्यासाठी सुमारे १६०० क्विंटल बियाणे लागते. यात बासमती, रत्नागिरी १४, कोलंबा, सोनम, कर्जत १८४, तांबडीसाळ याचा समावेश आहे.

Web Title: There is no sine of Rohini nakshatra due to water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.