चिंताजनक! पावसाने दडी मारल्याने पश्चिम विदर्भातील साडेपाच लाख हेक्टर क्षेत्रात अद्याप पेरणी नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 05:42 PM2019-07-18T17:42:49+5:302019-07-18T17:43:49+5:30
पेरणीपासून पावसाच्या सरासरीत ४३ टक्क्यांची तूट व आता १५ दिवसांपासून दडी यामुळे पश्चिम विदर्भात ५ लाख ५८ हजार हेक्टर क्षेत्र नापेर राहिले आहे.
अमरावती - पेरणीपासून पावसाच्या सरासरीत ४३ टक्क्यांची तूट व आता १५ दिवसांपासून दडी यामुळे पश्चिम विदर्भात ५ लाख ५८ हजार हेक्टर क्षेत्र नापेर राहिले आहे. दोन दिवसांत पाऊस न आल्यास किमान १० लाख हेक्टर क्षेत्रातील पेरण्या उलटण्याची भीती निर्माण झालेली आहे. पावसाळ्यात तापमानवाढ झाल्याने कोवळ्या पिकांनी माना टाकल्या, तर बीजांकुर करपायला लागले आहेत. पेरणीला उशीर झाल्यामुळे शेतकºयांनी आपत्कालीन नियोजन करणे महत्त्वाचे आहे.
पावसाचे १२० पैकी ४८ दिवस पार झाले आहेत. या कालावधीत सरासरीच्या ५७ टक्केच पाऊस झाल्याने अमरावती विभागातील पेरण्या माघारल्या. विभागीय उपसंचालक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, अमरावती विभागात १ जून ते १८ जुलै या कालावधीत ३००.९ मिमी सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात १६७ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. विभागातील पाचही जिल्हे पावसाच्या सरासरीत माघारले आहेत. अमरावती जिल्ह्यात सरासरीच्या ५१ टक्केच पाऊस झालेला आहे. अकोला ६५, यवतमाळ ३५.८, बुलडाणा ८२.७ व वाशिम जिल्ह्यात ५१.२ टक्के पावसाची नोंद झालेली असल्याने याचा थेट परिणाम पेरणीवर झाला आहे.
यंदाच्या खरीप हंगामात अमरावती विभागात ३२ लाख ३१ हजार ८०० हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्याच्या तुलनेत सद्यस्थितीत २६ लाख ७३ हजार १०० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. ही ८३ टक्केवारी आहे. पावसाअभावी अद्यापही साडेपाच लाख हेक्टरवरील पेरण्या रखडल्या आहेत. विभागीय सहसंचालकांच्या माहितीनुसार अमरावती जिल्ह्यात ४,५३,५०० हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली, ही ६१ टक्केवारी आहे. बुलडाणा जिल्ह्यात समाधानकारक पावसामुळे ६,९७,००० हेक्टरमध्ये ९८ टक्के पेरणी आटोपली. अकोला जिल्ह्यात ३,४४,००० हेक्टर म्हणजे ७२ टक्के, वाशीम जिल्ह्यात ३ लाख १० हजार हेक्टर म्हणजेच सरासरीच्या ८३ टक्के, तर यवतमाळ जिल्ह्यात ८ लाख ४७ हजार ३०० हेक्टर म्हणजे सरासरी क्षेत्राच्या ९४ टक्के क्षेत्रात पेरणी आटोपली आहे.
सोयाबीन, कपाशीचे सर्वाधिक क्षेत्र
यंदा सर्वाधिक ११ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी सद्यस्थितीत झाली आहे. कपाशी ९ लाख ८८ हजार ८०० हेक्टर, धान १०८४ हेक्टर, खरीप ज्वारी ३,९२०० हेक्टर, बाजरी २९८ हेक्टर, मका २,७२०० हेक्टर, तूर ३,५५,९०० हेक्टर, मूग ५२,३००, उडीद ४५,१०० हेक्टर, भुईमूग ६०० हेक्टर, तीळ १६०० हेक्टर, सूर्यफूल १३ हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. मात्र, पावसाचा ४ जुलैपासून खंड असल्याने यापैकी २५ ते ४० टक्के क्षेत्रात दुबार पेरणीची शक्यता आहे.
यवतमाळ जिल्ह्यात सरासरीच्या ३५.८ टक्केच पाऊस
पश्चिम विदर्भातील २६ तालुक्यांत पावसाची सरासरी ५० टक्क्यांच्या आत आहे. यापैकी यवतमाळ जिल्ह्यात पावसाची स्थिती फार गंभीर आहे. यामध्ये सर्वच १६ ही तालुक्यांत अपेक्षित सरासरीच्या ३५.८ टक्केच पावसाची नोंद आतापर्यंत झालेली आहे. अमरावती जिल्ह्यात पाच, अकोला एक, बुलडाणा एक तर वाशिम जिल्ह्यात तीन तालुक्यांची सरासरी ५० टक्क्यांच्या आत आहे. सर्वाधिक १२३ टक्के पाऊस शेगाव, तर सर्वात कमी २९ टक्के पाऊस मूर्तिजापूर तालुक्यात झालेला आहे.