शिकविण्यास शिक्षकच नाहीत

By admin | Published: July 14, 2017 01:29 AM2017-07-14T01:29:15+5:302017-07-14T01:29:15+5:30

मे महिन्यामध्ये शिक्षण मंडळ बरखास्त केले. त्यामुळे सध्या महापालिकेच्या शाळांना कुणीच वाली राहिला नाही.

There is no teacher to teach | शिकविण्यास शिक्षकच नाहीत

शिकविण्यास शिक्षकच नाहीत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हडपसर : मे महिन्यामध्ये शिक्षण मंडळ बरखास्त केले. त्यामुळे सध्या महापालिकेच्या शाळांना कुणीच वाली राहिला नाही. शाळेत शिकवण्यास शिक्षक नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. शालेय वस्तू विकत घेण्यासाठी डेबिट कार्ड पालिकेकडून दिले जाणार होते तेसुद्धा विद्यार्थ्यांना मिळाले नाही. त्यामुळे पालकांमध्ये प्रचंड असंतोष पसरत आहे.
गोंधळेनगर येथे कै. रामचंद्र अप्पा बनकर शाळा ही इंग्रजी माध्यमाची असून ज्युनिअर के जी ते ८वी पर्यंत आहे. या शाळेत एकूण २७ वर्ग असून, सध्या तिथे १५ शिक्षक काम करीत आहेत. त्यामुळे नाईलाजास्तव एका शिक्षकाला सुमारे १४० ते १८० मुलांना शिकवावे लागते. त्यामुळे शिक्षक, पालक व विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहे. शिक्षक नसल्यामुळे पालकांमध्ये प्रचंड असंतोष पसरत आहे. शाळा १५ जूनपासून चालू झाली असून अद्याप शिक्षकांचा पत्ता नाही. शालेय वस्तू विकत घेण्यासाठी डेबिट कार्ड पालिकेकडून दिले जाणार होते तेसुद्धा विद्यार्थ्यांना मिळाले नाही. तसेच मे महिन्यामध्ये शिक्षण मंडळ बरखास्त केले असून, सध्या महापालिकेच्या शाळांना कुणीच वाली नाही. बनकर शाळेमध्ये एकूण १२ शिक्षक डी.एड.चे, मॉन्टेसरीला २ शिक्षक, १ रखवालदार, १ शिपाई, ६ बालवाडी सेविका आणि हाऊसकीपिंगसाठी ४ सेवक इत्यादी मनुष्यबळाची आवश्यकता आहे.
या संदर्भामध्ये आयुक्त व शिक्षण अधिकारी यांच्याशी वारंवार तोंडी चर्चा करूनही काही निष्पन्न होत नाही. पालिकेत भाजपाची एकहाती सत्ता असूनही शैक्षणिक सुविधा देण्यास विलंब लागत आहे, असे नगरसेवक योगेश ससाणे यांनी सांगितले.
पुणे महानगरपालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या ४९ शाळा कार्यरत आहेत. परंतु प्रत्यक्षात ११ शाळांना राज्य शासनाची परवानगी आहे. त्यामुळे शिक्षकभरती तसेच मुख्याध्यापक ही पदे वेळेवर भरली जात नाहीत. याचा तोटा महापालिकेच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना बसत आहे. याच बनकर शाळेमध्ये सध्या सुमारे १६७६ विद्यार्थी आहेत. तसेच या शाळेमध्ये सुमारे ५४ वर्ग खुले आहेत.
तसेच ग्रंथालय, सायन्स लॅब, एरोमॉडेलिंग, संगणक लॅब, संगीत (म्युझिक) रूम, तसेच अ‍ॅडोटोरिअम, जिम, बॅडमिंटन हॉल, स्नूकर हॉल, स्वीमिंग टँक, टेबल टेनिस, आरचरी इत्यादी अ‍ॅक्टिव्हिटी आणि सुसज्ज अशी इमारत व साहित्य उपलब्ध असून, ते सर्व धूळ खात पडले आहे, कारण पालिकेतर्फे त्याला प्रशिक्षक नाहीत.
पालिकेच्या शाळांचा विचार करता बनकर प्रशाला ही एक क्रमांकाचे संकुल तयार असून, यावर्षी तरी सर्व अ‍ॅक्टिव्हिटी चालू करण्यासाठी महापालिकेने निधी, कर्मचारी, शिक्षक/प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. अन्यथा कोट्यवधी रुपये खर्च होऊनही त्याचा लाभ मुलांना मिळणार नाही. तसेच या संकुलामध्ये विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
मुख्याध्यापकांचे आॅफिस, स्टाफरूम, सर्व तयार असूनही पालिकेच्या भवन खात्याकडून ताबा मिळाला नाही. तसेच शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे चालू असून ते फक्त नावाला आहेत. त्याचा बॅकअप सेव्ह होत नसल्यामुळे ते फक्त नावापुरतेच आहे. ज्युनिअर केजी व सिनिअर केजीचे क्लासरूम आतून रंगविणे (चित्र, प्रसंग) गरजेचे आहे. तसेच शाळेला सुमारे ३५० बेंच कमी आहेत. त्यामुळे मुलांना खाली बसावे लागते. मुलांना जेवणासाठी कँटीनचे काम चालू असून, ते लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. तळमजल्यावरील ज्या वर्गखोल्या आहेत त्याच्या समोरील पॅसेज हा लोखंडी ग्रीलने बंद करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तरी या सर्व बाबींचा विचार करून त्वरित योग्य ती कारवाई करावी, अन्यथा पालक, विद्यार्थी आंदोलन करतील, असा इशारा नगरसेवक योगेश ससाणे यांनी दिला आहे. भरतीसाठी जाहिरात दिली होती, अजून एक जाहिरात येईल. नंतर टप्प्याटप्प्याने शिक्षक भरती केली जाईल. १५ दिवसांंत पालिकेच्या कै. रामचंद्रअप्पा बनकर शाळेत शिक्षक दिले जातील.
- दीपक माळी,
महापालिका शिक्षण विभाग

महापालिका शिक्षण विभागाकडे शिक्षकांच्या नियुक्तीसाठी वारंवार पाठपुरावा केला आहे. १५ जुलैपर्यंत शिक्षक मिळतील असे अधिकारी यांनी सांगितले. कर्मचारी काम नाहीत नगरसेवकांच्या पुढे पुढे करतात.
- वैशाली बनकर,
नगरसेविका

Web Title: There is no teacher to teach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.