आयटीआय प्रवेशाला मुदतवाढ मिळेना
By admin | Published: September 21, 2016 05:52 AM2016-09-21T05:52:21+5:302016-09-21T05:52:21+5:30
आयटीआयच्या २६ हजार ५९४ जागा रिक्त असतानाही फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आयटीआय प्रवेशापासून वंचित राहावे लागणार
मुंबई : राज्यातील आयटीआयच्या २६ हजार ५९४ जागा रिक्त असतानाही फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आयटीआय प्रवेशापासून वंचित राहावे लागणार आहे. कारण कौशल्य विकास आणि उद्योजकता केंद्रीय मंत्रालयाच्या महासंचालकांनी २५ सप्टेंबरपर्यंत राज्यातील आयटीआय प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचे आदेश १२ सप्टेंबर रोजी सर्व राज्यांना दिले आहेत. मात्र राज्यात प्रवेश प्रक्रिया गुंडाळलेल्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने अद्याप प्रवेशाला मुदतवाढ दिलेली नाही.
संचालनालयाच्या कामचुकारपणामुळे दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. बारावीच्या फेरपरीक्षेला सुमारे सव्वा लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर दहावीच्या फेरपरीक्षेला नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दीड लाखाच्या घरात आहे. अशा परिस्थितीत फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकडून आयटीआयमधील दहावी, बारावी उत्तीर्ण अर्हता असलेल्या ट्रेडला पर्याय दिला जातो. मात्र राज्यातील आयटीआय प्रवेश प्रक्रिया ३१ आॅगस्ट रोजी संपुष्टात आली आहे. याउलट दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल ३० आॅगस्टला लागला असून, बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल २३ आॅगस्टला लागला आहे. त्यामुळे या सर्वच विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षणास प्रवेश देण्याऐवजी शासनाकडून खच्चीकरण केले जात आहे.
या परिपत्रकासंदर्भात राज्य शासनाकडे पाठपुरावा केल्याचे महाराष्ट्र राज्य खासगी आयटीआय कर्मचारी, प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष संजय बोरस्ते यांनी सांगितले. ते म्हणाले की, प्रशिक्षण मंत्रालयाचे उपमहासंचालक दिपंकर मलिक यांनी राज्यातील संचालकांना १२ सप्टेंबर, २०१६ रोजी प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र एक आठवडा झाला, तरी शासनाकडून प्रतिसाद मिळालेला नाही. प्रवेशासाठी आवश्यक आॅनलाइन वेबसाइट अद्याप बंद आहे. त्यामुळे विद्यार्थी प्रवेशासाठी आयटीआयमध्ये येत असले, तरी प्रवेश देता येत
नाही. (प्रतिनिधी)
>आयटीआयमधील रिक्त जागा
आयटीआयरिक्त जागा
शासकीय७ हजार ७५२
खासगी१८ हजार ८४२
एकूण२६ हजार ५९४
>फेरपरीक्षेतील विद्यार्थ्यांची सद्य:स्थिती
इयत्ता विद्यार्थी संख्या
बारावी उत्तीर्ण ३२ हजार ९२१
बारावी अनुत्तीर्ण९० हजार २५३
दहावी उत्तीर्ण ३९ हजार ९९४
दहावी अनुत्तीर्ण१ लाख ३ हजार ९०३