आश्रमशाळांमध्ये टुथपेस्ट घोटाळा नाही
By admin | Published: March 31, 2017 01:42 AM2017-03-31T01:42:31+5:302017-03-31T01:42:31+5:30
आदिवासी आश्रमशाळांमध्ये ११ कोटींचा टुथपेस्ट घोटाळा झाला नसून अद्याप कुणाला टेंडर देण्यात आलेले नाही
मुंबई : आदिवासी आश्रमशाळांमध्ये ११ कोटींचा टुथपेस्ट घोटाळा झाला नसून अद्याप कुणाला टेंडर देण्यात आलेले नाही, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी आज विधान परिषदेत दिली. तसेच आश्रमशाळांच्या स्थितीबाबत राज्यपालांनी लक्ष घातल्यानंतर दक्षता समिती स्थापन झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील फुलवडे आणि मावळमधील वडेश्वर येथील मुलींच्या आश्रमशाळेतील विद्यार्थिनीशी होत असलेली असभ्य वर्तणूक तसेच आश्रमशाळेची धोकादायक स्थिती याबाबत शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी लक्षवेधी सूचना मांडली. त्याचवेळी ११ कोटींच्या टुथपेस्ट घोटाळ्याकडे लक्ष वेधले. टूथपेस्ट घोटाळ्याला राज्य सरकारचे संरक्षण आहे का, असा सवाल त्यांनी केला. त्यावर उत्तर देताना सवरा म्हणाले की, १२६ आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना टुथपेस्टसह खोबरेल तेल, साबण, नॅपकीन या वस्तू पुरवल्या जात आहेत. त्यासाठी १० निविदा आल्या होत्या. त्यातील नऊ निविदा पात्र ठरल्या तर एक अपात्र. एका निविदाधारकाने उच्च न्यायालयात धाव घेतली असल्याने अद्याप तरी कुणालाही टेंडर देण्यात आलेले नाही. विद्यार्थिनींची गैरसोय होऊ नये म्हणून तूर्तास स्थानिक पातळीवर टुथपेस्टची खरेदी करण्यात आली आहे.