१७ डिसेंबरपर्यंत पाणी नाही

By admin | Published: December 5, 2015 09:07 AM2015-12-05T09:07:11+5:302015-12-05T09:07:11+5:30

नाशिक-नगरच्या धरणांतून मराठवाड्याच्या जायकवाडी धरणामध्ये १२.८४ टीमएसीपैकी आतापर्यंत १०.७४६ टीमसी पाणी सोडण्यात आले आहे. उर्वरित २.४४ टीमसी पाणी जायकवाडीमध्ये

There is no water till December 17th | १७ डिसेंबरपर्यंत पाणी नाही

१७ डिसेंबरपर्यंत पाणी नाही

Next

मुंबई : नाशिक-नगरच्या धरणांतून मराठवाड्याच्या जायकवाडी धरणामध्ये १२.८४ टीमएसीपैकी आतापर्यंत १०.७४६ टीमसी पाणी सोडण्यात आले आहे. उर्वरित २.४४ टीमसी पाणी जायकवाडीमध्ये सोडण्याबाबत नाशिक-नगरकरांचा आक्षेप असल्याने हे पाणी १७ डिसेंबरपर्यंत सोडण्यात येणार नाही, अशी माहिती शुक्रवारी राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली. त्यामुळे तूर्तास तरी मराठवाड्याला उर्वरित पाणी मिळणार नाही.
गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे विकास प्राधिकरणाने (जीएमआयडीसी) ७ आॅक्टोबर रोजी नाशिक-नगरच्या धरणांतून मराठवाड्याच्या जायकवाडी धरणामध्ये १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. हे पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी सोडण्यात येणार असल्याचे जीएमआयडीसीने जाहीर केले.
या निर्णयाला नाशिक-नगरकरांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. अंतरिम दिलासा देताना उच्च न्यायालयाने नाशिक-नगरच्या धरणांतून जायकवाडीमध्ये पिण्यासाठीच पाणी सोडण्याचा आदेश जीएमआयडीसीला दिले. त्यानुसार जीएमआयडीसीने १२.८४ टीमसी पाणी जायकवाडी धरणात टप्प्याटप्याने सोडण्यास सुरुवात केली.
जीमएमआयडीसीने ७ आॅक्टोबर रोजी पिण्यासाठी व शेतीसाठी १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला होता; तर उच्च न्यायालयाने केवळ पिण्यासाठी पाणी सोडण्याचा आदेश दिला असल्याने नाशिक- नगरकरांनी उच्च न्यायालयात अर्ज केला. न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारने पिण्यासाठी किती पाणी आवश्यक आहे, याचा अंदाज घेऊन तेवढेच पाणी जायकवाडीमध्ये सोडावे, अशी मागणी अर्जाद्वारे करण्यात आली आहे.
या अर्जावरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठापुढे होती. शुक्रवारच्या सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी आतापर्यंत नाशिक-नगरच्या धरणांतून जायकवाडीमध्ये १०.७४६ टीमएसी पाणी सोडले असून २.४४ टीमसी पाणी सोडणे शिल्लक असल्याची माहिती खंडपीठाला
दिली.
पुढील सुनावणीपर्यंत उर्वरित पाणी सोडणार की नाही? याबाबत भूमिका स्पष्ट करण्यास सांगितल्यावर सरकारी वकिलांनी पुढील सुनावणीपर्यंत म्हणजेच १७ डिसेंबरपर्यंत उर्वरित २.४४ टीमएसी पाणी जायकवाडीमध्ये सोडणार नसल्याची माहिती खंडपीठाला दिली. (प्रतिनिधी)

नाशिकमध्ये पाण्यावरून राजकीय जुगलबंदी
नाशिक : मराडवाड्यासाठी पाणी सोडण्यात आल्याने भविष्यात उद्भवणारे जलसंकट लक्षात घेऊन आठवड्यात एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा महापालिका महासभेने घेतलेला निर्णय रद्द करण्याची सूचना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. तर, महापौर अशोक मुर्तडक यांनी मात्र पाणीकपातीच्या निर्णयावर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे.
जुलै-आॅगस्टपर्यंत पाणी कसे पुरवायचे, याविषयी पालकमंत्र्यांनी नाशिकमध्ये जलतज्ज्ञांच्या उपस्थितीत बैठक घ्यावी आणि एकदाचा सोक्षमोक्ष लावावा. त्यानंतरच पाणीकपातीबाबत पुनर्विचार करण्यात येईल, असे सांगत महापौरांनी पालकमंत्र्यांच्याच कोर्टात चेंडू पुन्हा टोलविला आहे.
महापौरांनी ३० नोव्हेंबर रोजी सध्याच्या एकवेळ पाणीपुरवठ्याबरोबरच डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांसाठी आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला होता. भाजपा वगळता अन्य सर्व पक्षांनी या निर्णयाला मान्यता दिली होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांनी महापालिकेला पत्र पाठवून आठवड्यातून संपूर्ण एक दिवस होणारी पाणीकपात रद्द करण्याची सूचना केली होती, शिवाय नाशिककरांना जुलैपर्यंत पुरेल इतक्या पाण्याचा पुरवठा करण्याची ग्वाही दिली होती.
एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रातील दोन संच बंद असल्याने त्यांच्यासाठी आरक्षित असलेल्या पण पुढे विकल्या जाणाऱ्या पाण्यातून ३०० े दशलक्ष घनफूट (दलघफू) पाणी याप्रमाणे एकूण ५०० दलघफू पाणी उपलब्ध करून द्यावे असे महापौरांनी सांगितले.

उदगीरमध्ये रास्ता रोको
उदगीर (जि. लातूर) : युवक काँग्रेसच्या वतीने शहरातील पाणी प्रश्नासाठी गुरुवारी शिवाजी चौकात रास्ता रोको करण्यात आला.
उदगीर शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे पालिकेने तिरु प्रकल्पातून पाण्याची तात्पुरती योजना राबविण्यासाठी १२़६४ कोटी रुपयांचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे़ मात्ऱ, त्याला मंजुरी न मिळाल्याने भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे़ त्यामुळे तिरू प्रकल्पातून पाणी घेण्याची तात्पुरती योजना मंजूर करण्यात यावी, या मागणीसाठी युवक काँग्रेसच्या वतीने उदगीरच्या शिवाजी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़

Web Title: There is no water till December 17th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.